Chandrapur News: सुविधा गॅस एजन्सी की 'असुविधा' केंद्र? लंच ब्रेकच्या नावाखाली वितरण अडीच तास बंद!

Bhairav Diwase
भर उन्हात ग्राहकांचे हाल; गॅस एजन्सीत महिला आणि नागरिकांचा संताप
चंद्रपूर:- सुविधा गॅस एजन्सी की 'असुविधा' गॅस एजन्सी? असा प्रश्न विचारण्याची वेळ आता ग्राहकांवर आली आहे. लंच ब्रेकच्या नावाखाली एजन्सीच्या मुख्य गेटला चक्क कुलूप लावून कर्मचारी जेवणात मग्न होते, तर दुसरीकडे भर उन्हात महिला आणि नागरिक दोन ते अडीच तास ताटकळत उभे होते.

सूर्य आग ओकत आहे आणि सुविधा गॅस एजन्सीच्या समोर महिलांची मोठी रांग लागली आहे. पण धक्कादायक बाब म्हणजे, एजन्सीच्या कर्मचाऱ्यांनी चक्क मुख्य गेटला कुलूप लावून घेतले आहे. कारण काय? तर म्हणे लंच टाइम सुरू आहे! दोन ते अडीच तास नागरिक उन्हात उभे होते. कर्मचारी जेवण करत होते आणि नागरिक बाहेर घामाघूम होत राहिले. यामुळे ग्राहकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.


महत्त्वाची बाब अशी की, या सुविधा गॅस एजन्सीवर असा गोंधळ होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही एकदा येथील ढिसाळ नियोजनामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला आहे. वारंवार होणाऱ्या या त्रासामुळे आता नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत झाला असून, या एजन्सीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.