Pani puri 'spilled'; 50 people get food poisoning! पाणीपुरीचा 'तडका' बसला; ५० जणांना अन्नातून विषबाधा!

Bhairav Diwase
चंद्रपूर:- जिल्ह्याच्या सावली तालुक्यातील अंतरगाव येथे बुधवारी सायंकाळी आनंदाने पाणीपुरी खाणाऱ्या नागरिकांसाठी ही मेजवानी दुसऱ्या दिवशी सकाळी चांगलीच महाग पडली. १ एप्रिल रोजी सायंकाळी अनेकांनी गावातील एका हातगाडीवर पाणीपुरीचा आस्वाद घेतला. मात्र, गुरुवारी पहाटेपासूनच एक-एक करून नागरिकांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला.


परिस्थिती इतकी गंभीर झाली की, अवघ्या काही तासांत ५० रुग्ण अंतरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाले. यात लहान मुलांची संख्या अधिक असल्याने गावात एकच खळबळ उडाली. आरोग्य विभागाने तातडीने पावले उचलत गावातच कॅम्प लावला. दहा रुग्णांना सलाईन लावावी लागली तर ४० जणांना ओआरएस पावडर व गोळ्या दिल्या. सध्या सर्वाची प्रकृती स्थिर आहे.


घटनेची माहिती मिळताच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र चौधरी यांनी चमुसह गावात तळ ठोकला. अन्न व औषध प्रशासनाने तातडीने पाणीपुरीचे आणि पाण्याचे नमुने गोळा करून प्रयोगशाळेत पाठवले आहेत. दूषित पाण्यामुळे ही विषबाधा झाली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. संबंधित विक्रेत्याला ग्रामपंचायतीने कडक नोटीस बजावली असून, नागरिकांनी उघड्यावरील पदार्थ खाताना काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.


सध्या सर्व रुग्णांची प्रकृती धोक्याबाहेर असली, तरी या घटनेने गावकरी मात्र दहशतीत आहेत. प्रशासनाने खबरदारी म्हणून गावात दोन दिवस आरोग्य पथक तैनात ठेवले होते.