कुरखेडा:- तालुक्यातील रामगड येथे रविवारी सकाळी विजांच्या कडकडाटासह झालेल्या अवकाळी पावसाने एका १६ वर्षीय युवकाचा बळी घेतला. डेकोरेशनचे काम करत असताना अंगावर वीज पडल्याने दिशांत रेवाराम सतीमेश्राम (रा. मूरमाडी, पारडी, ता. लाखांदूर, जि. भंडारा) या युवकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. ऐन लग्नकार्यात ही घटना घडल्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिशांत हा रामगड येथील एका डेकोरेशन कंत्राटदाराकडे कामाला होता. रविवारी सकाळी विवाह सोहळा असल्याने दिशांत डेकोरेशनचे साहित्य लावत होता. सकाळी अचानक वातावरणात बदल झाला आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली. याच दरम्यान अंगावर वीज कोसळल्याने दिशांतचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.


