दुःखाच्या काळात आर्थिक आधार; दोन कुटुंबांना बँक ऑफ इंडियाची मदत.
बल्लारपूर:- तालुक्यातील बामणी येथील बँक ऑफ इंडिया शाखा ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यात सातत्याने उत्कृष्ट कार्य करत असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. केवळ एका महिन्याच्या कालावधीत शाखेने दोन दुर्दैवी कुटुंबांना एकूण ४ लाख रुपयांचा विमा लाभ मिळवून देत सामाजिक बांधिलकी जपली आहे.
मागील तीन महिन्यांत ग्रा. पं. बामणी व ग्रा. पं. लावारी येथे घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये विनायक भोयर व राकेश पोतराजे यांचा आकस्मिक मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर मोठे आर्थिक संकट ओढवले होते. अशा कठीण प्रसंगी बँक ऑफ इंडिया बामणी शाखा त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली.
बँकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तत्परतेने प्रयत्न करत या दोन्ही कुटुंबांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना अंतर्गत लाभ मिळवून दिला. अवघ्या एका महिन्यात प्रक्रिया पूर्ण करून वारसांना प्रत्येकी २ लाख रुपयांचे धनादेश सुपूर्द करण्यात आले.
या उपक्रमात शाखा व्यवस्थापक निखिल भोगे, विशेष सहाय्यक कार्तिक वराटे, अधिकारी ऋषी नगराळे, अन्वेष बडोले, श्री. खनके तसेच कु. नेहा, शुभांगी व श्री. साहिल या कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
गमावलेली व्यक्ती परत येऊ शकत नाही मात्र विम्याचा हा लाभ कुटुंबाला आर्थिक आधार देतो असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. तसेच नागरिकांनी केवळ २० रुपयांत मिळणारा प्रधानमंत्री सुरक्षा विमा व ४३६ रुपयांचा प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहनही करण्यात आले.
बँक ऑफ इंडिया बामणी शाखेचे हे कार्य पंचक्रोशीत कौतुकास्पद ठरत असून ग्रामीण भागातील जनतेसाठी एक विश्वासार्ह आधार म्हणून शाखा ओळख निर्माण करत आहे.


