Young man dies of heart attack: खाकीचं स्वप्न अपूर्णच! हृदयविकाराच्या झटक्याने तरुणाचा मृत्यू

गडचिरोली:- राज्य राखीव पोलीस दलाच्या भरती प्रक्रियेत सहभागी झालेल्या एका २१ वर्षीय तरुणाचा धावताना मृत्यू झाला आहे. देसाईगंज तालुक्यातील विसोरा येथे ही घटना घडली असून, यामुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.


आरमोरी तालुक्यातील देलोडा येथील रहिवासी असलेला आशिष भास्कर म्हशाखेत्री हा तरुण राज्य राखीव दलात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून विसोरा येथील कॅम्पमध्ये दाखल झाला होता. सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास त्याची शारीरिक चाचणी सुरू होती. आशिष हा एक उत्तम आणि वेगवान धावपटू म्हणून ओळखला जात होता. काल सकाळी त्याची ५ किलोमीटर धावण्याची महत्त्वाची चाचणी सुरू असताना, अचानक तो जमिनीवर कोसळला. उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली, मात्र हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने आशिषची प्राणज्योत मालवली.