Chandrapur News: चंद्रपूर काँग्रेसचा जिल्हा व शहर अध्यक्ष दिल्लीत ठरणार!

Bhairav Diwase

चंद्रपूर:- आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आता कंबर कसली आहे. जिल्हा आणि शहर काँग्रेस समितीचे अध्यक्ष कोण असावेत, याचा निर्णय आता स्थानिक पातळीवर नाही, तर थेट दिल्लीत होणार आहे. 'संघटन सृजन अभियानांतर्गत' ही नवीन आणि पारदर्शक निवड प्रक्रिया राबवली जात आहे.


अखिल भारतीय काँग्रेसचे निरीक्षक संतोष कोलकोंडा आणि प्रदेश निरीक्षक अभय छाजेड यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली. केवळ नेतेच नाही, तर सिव्हील सोसायटी, पत्रकार, सामान्य कार्यकर्ता आणि हजारो नागरिकांशी 'वन टू वन' चर्चा करून एक सविस्तर अहवाल तयार केला जाणार आहे. सुमारे ३ ते ५ हजार लोकांशी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संवाद साधल्यानंतर, ६ सर्वोत्तम नावांची यादी दिल्लीत अखिल भारतीय काँग्रेस समितीकडे पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर काँग्रेस सरचिटणीस आणि प्रदेश प्रभारी योग्य व्यक्तीची निवड करतील.


ही प्रक्रिया केवळ जिल्हाध्यक्षांपुरती मर्यादित नाही. १८ ब्लॉक अध्यक्षांपासून ते युवक काँग्रेस, महिला काँग्रेस आणि अल्पसंख्यांक सेलच्या निवडीही याच पद्धतीने केल्या जाणार आहेत. पक्षात चैतन्य निर्माण करणे आणि बूथ स्तरावर संघटन मजबूत करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.


यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे (AICC) निरीक्षक श्री. संतोष कोलकोंडा, खासदार प्रतिभा धानोरकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कोषाध्यक्ष अभय छाजेड, चंद्रपूर जिल्हा काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्री. सुभाष धोटे, चंद्रपूर शहर काँग्रेस शहराध्यक्ष श्री. संतोष लहामगे, तसेच चंद्रपूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी आणि जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत होते.