चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष थांबण्याचे नाव घेत नाहीये. नागभीड तालुक्यातील मिंथुर शेत शिवारात वाघाच्या हल्ल्यात एका ५८ वर्षीय शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले असून वनविभागाप्रती संताप व्यक्त केला जात आहे.
मिंथुर येथील रहिवासी हरिदास महादेव कुबडे हे शनिवारी सकाळी मोहफुले वेचण्यासाठी आपल्या शेताकडे गेले होते. मात्र, दिवस मावळला तरी ते घरी परतले नाहीत. चिंतेत पडलेल्या कुटुंबीयांनी आणि ग्रामस्थांनी परिसरात त्यांचा शोध सुरू केला. रात्रीचा काळोख आणि हिंस्त्र श्वापदाची भीती यामुळे शोध मोहिमेत अडथळे आले.
आज म्हणजेच रविवारी सकाळी वनविभागाच्या पथकाने आणि ग्रामस्थांनी पुन्हा शोध मोहीम राबवली असता, शेताजवळील एका नाल्यात हरिदास कुबडे यांच्या शरीराचे छिन्नविछिन्न अवशेष आढळून आले. वाघाने त्यांच्यावर हल्ला करून त्यांना ओढत नेल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या घटनेनंतर मिंथुर आणि आजूबाजूच्या गावांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.


