२९३ सराईत गुन्हेगारांची घेतली 'ओळख परेड'!
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यात अवैध गो-वंश तस्करी, कत्तल आणि मुक्या जनावरांवरील क्रूरतेचे जाळे समूळ नष्ट करण्यासाठी जिल्हा पोलिसांनी आतापर्यंतची सर्वात मोठी आणि कडक मोहीम हाती घेतली आहे. थेट पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनाखाली आज पोलीस मुख्यालयातील 'ड्रिल शेड' मध्ये जिल्ह्यातील तब्बल २९३ हजर सराईत गो-तस्करांची 'ओळख परेड' घेण्यात आली. चंद्रपूर, वरोरा, चिमूर, ब्रह्मपुरी, मूल, राजुरा आणि गडचांदूर अशा सर्व उपविभागांतील गुन्हेगारांना एकाच ठिकाणी बोलावून पोलिसांनी त्यांची संपूर्ण कुंडली समोर ठेवली.
हजर सराईत गो-तस्करांना चंद्रपूर पोलिसांचा थेट इशाराः
'मकोका' (MCOCA) अंतर्गत कारवाईः यापुढे अवैध आणि क्रूर वाहतूक करणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांवर थेट 'मकोका' (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) अंतर्गत कडक कारवाई केली जाईल.
जामीन मिळणे कठीणः मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यास जामीन मिळणे कठीण होऊन प्रदीर्घ काळ तुरुंगात राहावे लागेल.
मालमत्ता जप्तीची कारबाईः अवैध मार्गाने व मुक्या जनावरांचा छळ करून कमावलेल्या संपूर्ण संपत्तीवर कायद्यानुसार जप्तीची (Confiscation) कारवाई केली जाईल.
वाहने राजसाथ होणारः तस्करीसाठी वापरलेले प्रत्येक वाहन न्यायालयातून सुटणार नाही, ते थेट सरकार जमा (राजसात) केले जाईल.
या विशेष कॅम्पमध्ये पोलीस उपअधीक्षक कायंदे पाटील (IPS), परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक सचिन खेत्रे आणि LCB चे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चोख कामगिरी बजावली. पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले आहे की, यापुढे साधी कलमे न लावता संघटित गुन्हेगारी अंतर्गत थेट मकोका लावला जाईल. तसेच नागरिकांनी अशा अवैध कृत्यांची माहिती पोलिसांना द्यावी, माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णपणे गुप्त ठेवले जाईल, असे आवाहनही त्यांनी केले आहे

