चंद्रपूर:- सकाळची नऊ वाजायची वेळ... जंगलात पक्षांचा किलबिलाट सुरू होता आणि सोबतीला गुंजेवाही गावातील १३ महिलांचे बोलणं चालणं सुरु होतं. आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी या महिला नेहमीप्रमाणे जंगलात तेंदूपत्ता गोळा करत होत्या. कष्टाचे चार पैसे हातात येतील या आशेने प्रत्येकीचे हात वेगाने चालत होते. पण, याच घनदाट झाडीत त्यांच्या अगदी जवळ एक काळ दबा धरून बसलाय, याची पुसटशी कल्पना एकीलाही नव्हती.
अचानक झाडीतून हवेत झेपावला अन्...
अचानक एका झुडपातून अंगावर शहारे आणणारी डरकाळी फुटली आणि एक वाघीण थेट महिलांच्या अंगावर झेपावली. अचानक झालेल्या या हल्ल्याने महिलांची बोबडीच वळली. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी ज्याला जशी जमेल तशी प्रत्येकजण जिवाच्या आकांताने सैरावैरा पळू लागली.
वाघिणीचा हा हल्ला इतका भयंकर आणि वेगवान होता की, तिने एकापाठोपाठ एक अशा महिलांवर झडप घातली. कुणाच्या मानेचा लचका तोडला तर कुणाच्या गळ्यावर थेट वार केले. या भीषण हल्ल्यात ४ महिलांचा जागीच मृत्यू झाला.
मृत महिलांची नावे:
> कवळाबाई मोहुर्ले (४५ वर्ष)
> अनिता मोहुर्ले (४६ वर्ष)
> संगीता चौधरी (३६ वर्ष)
> सुनीता मोहुर्ले (३३ वर्ष)
.....अन् एक महिला ओरडतच गावाच्या दिशेने धावली
आपल्यासोबत काम करणाऱ्या मैत्रिणींना वाघ डोळ्यांसमोर ओरबाडत आहे हे पाहून, एक महिला जीव मुठीत घेऊन गावाच्या दिशेने धावली. घामाने डबडबलेली, कापत्या आवाजात आणि थरथरत्या पायांनी ती गावात पोहोचली. धापा टाकत तिने टाहो फोडला— *"जंगलात वाघाने सगळ्यांना पकडलंय, धावा... धावा...!"*
तिची ही अवस्था पाहून गावकऱ्यांनी हातात लाठ्याकाठ्या, कुऱ्हाडी आणि कोयते घेतले आणि जंगलाच्या दिशेने धाव घेतली. गावकऱ्यांचा आरडाओरडा ऐकून वाघीण तिथून जंगलात पळून गेली. पण जेव्हा गावकरी घटनास्थळी पोहोचले, तेव्हा तिथले दृश्य पाहून प्रत्येकाच्या काळजाचा थरकाप उडाला. चारही महिला रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या, तर इतर महिला झाडाझुडपांमागे भीतीने थरथरत उभ्या होत्या.
मागच्या वर्षीच्या कटू आठवणी ताज्या
या घटनेमुळे सिंदेवाही तालुक्यात गेल्या वर्षी घडलेल्या अशाच एका भयंकर घटनेची जखम पुन्हा ताजी झाली आहे. गेल्या वर्षी १० मे रोजी याच तालुक्यातील मेंढा (माल) जंगलात तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या महिलांवर वाघाने हल्ला केला होता, ज्यामध्ये ३ महिलांचा बळी गेला होता. त्या घटनेला वर्ष पूर्ण होत नाही तोच, आता थेट ४ महिलांचा एकाच वेळी बळी गेला आहे.

