सिंदेवाही:- सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही जंगलात दोन दिवसांपूर्वी तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या चार महिलांचा अत्यंत क्रूरपणे बळी घेणाऱ्या नरभक्षक वाघिणीला अखेर जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. गेल्या दोन दिवसांपासून या परिसरात भीतीचे आणि तीव्र संतापाचे वातावरण होते. मात्र, वनविभागाने हाय-टेक तंत्रज्ञानाचा वापर करून आणि जीवाचे रान करून या वाघिणीला जेरबंद केले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात दोन दिवसांपूर्वी काळीज थरकाप उडवणारी घटना घडली होती. गुंजेवाही येथील खैरी शिवारात तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेलेल्या महिलांवर एका वाघिणीने अचानक हल्ला चढवला होता. या भीषण हल्ल्यात चार महिलांचा जागीच मृत्यू झाला होता. एकाच दिवशी झालेल्या या चार बळींमुळे संपूर्ण विदर्भ हादरला होता आणि गावकऱ्यांमध्ये वनविभागाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत होता.
या घटनेचे गांभीर्य ओळखून प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयाकडून तातडीने मंजुरी मिळवून वाघिणीला जेरबंद करण्यासाठी मोठी मोहीम हाती घेण्यात आली. हल्लेखोर वाघीण नेमकी कोणती आहे, हे शोधण्यासाठी वनविभागाने युद्धपातळीवर चक्र फिरवली. संपूर्ण परिसरात २० अत्याधुनिक ट्रॅप कॅमेरे आणि ३ मोशन सेन्सर लाईव्ह सीसीटीव्ही कॅमेरे तैनात करण्यात आले होते. तज्ज्ञ डॉक्टर, ट्रँक्विलायझर टीम आणि ताडोबाचे रॅपिड रिस्पॉन्स टीम (RRT) सतत या भागात गस्त घालत होते.
अखेर सिंदेवाही तालुक्यातील पवनपार तलावाजवळील परिसरात ही वाघीण वनविभागाच्या पथकाला दिसून आली. कोणतीही चूक न करता, विशेष पथकाने नियोजनबद्ध सापळा रचला. वाघीण जवळ येताच शूटरने अचूक निशाणा साधत तिला गुंगीचे औषध असलेला 'डार्ट' मारला. डार्ट लागल्यानंतर काही वेळातच वाघीण बेशुद्ध झाली.
वाघीण बेशुद्ध होताच तिला सुरक्षितपणे ताब्यात घेऊन पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले. प्राथमिक खात्रीनुसार हीच वाघीण हल्लेखोर असल्याचे सांगण्यात येत असले, तरी डीएनए नमुने आणि कॅमेरा ट्रॅपच्या आधारे अंतिम पडताळणी केली जाणार आहे. या कारवाईमुळे गेल्या दोन दिवसांपासून भीतीच्या छायेत जगणाऱ्या गुंजेवाही आणि परिसरातील गावकऱ्यांनी अखेर सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

