Murder News: पत्नीनेच रचला पतीच्या खुनाचा कट; एका लाखाची सुपारी देऊन केली हत्या!

Bhairav Diwase

चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील घोडपेठ परिसरात घडलेल्या एका धक्कादायक हत्येचा पोलिसांनी अवघ्या काही तासांत उलगडा केला आहे. कौटुंबिक कलहातून पत्नीनेच आपल्या पतीच्या खुनाची तब्बल १ लाख रुपयांची सुपारी दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी पत्नीसह चार आरोपींना अटक केली आहे.


काय आहे नेमकी घटना?


दि. ०२ मे २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजताच्या सुमारास घोडपेठ येथील कर्मवीर शाळेजवळ, हनुमान मंदिराच्या शेजारी एका इसमाचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृताची ओळख पटवली. रविंद्र तुळशिराम कुळमेथे (वय ४६, रा. मुधोली चेक नं. ०२, ता. चामोर्शी, जि. गडचिरोली) असे मृतकाचे नाव होते. प्राथमिक तपासात हा अकस्मात मृत्यू वाटत असला, तरी सखोल चौकशीत धक्कादायक सत्य समोर आले. मयताची पत्नी दिपमाला कुळमेथे हिने पतीच्या खुनाचा कट रचला होता.


असा घडला गुन्हा:

दिपमालाने नागपूर येथील वर्षा परचाके हिच्यासोबत संगनमत करून पतीच्या हत्येची योजना आखली. ठरल्याप्रमाणे दि. ३० एप्रिल रोजी दिपमालाने पतीला कारमध्ये बसवून आरोपींच्या ताब्यात दिले. त्यानंतर दि. ०१ मे रोजी दुपारी १२:०० वाजेच्या सुमारास आरोपी सोनू उर्फ प्रविण कालोकर व नाझीर अंसारी यांनी रविंद्र कुळमेथे यांना घोडपेठ येथील एका सुनसान ठिकाणी नेले. तेथे कारमध्येच त्यांचा गळा आवळून निर्घृण खून करण्यात आला. त्यानंतर मृतदेह घटनास्थळी टाकून आरोपी पसार झाले.


पोलिसांची संयुक्त कारवाई:

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, भद्रावती पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत अवघ्या काही तासांत आरोपींचा शोध घेतला. पोलिसांनी दिपमाला कुळमेथे व वर्षा परचाके यांना वरोरा येथून, तर सोनू उर्फ प्रविण कालोकर आणि नाझीर अंसारी यांना नागपूर येथून अटक केली आहे. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली कार आणि तीन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. पोलिस स्टेशन भद्रावती येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(२), १४०(२), ६१(२) अन्वये गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू आहे.


मार्गदर्शन आणि कामगिरी:

सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि वरोऱ्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोबरे यांच्या मार्गदर्शनाखाली भद्रावतीचे पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या पथकाने केली.