ACB Chandrapur: ब्रम्हपुरीत तालुका समूह संघटक अँटी करप्शनच्या जाळ्यात

Bhairav Diwase
बिल मंजूर करण्यासाठी मागितली होती ५ हजारांची लाच!

ब्रम्हपुरी:- ब्रम्हपुरी येथील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील तालुका समूह संघटक सुदेश ज्ञानेश्वर महाडोळे याला ५ हजार रुपयांची लाच घेताना अँटी करप्शन ब्युरोने रंगेहात अटक केली आहे. या प्रकरणातील तक्रारदार यांना शासनाकडून दरमहा १० हजार रुपये मानधन मिळते. याशिवाय त्यांनी केलेल्या माता-बाल आरोग्य सेवा, लसीकरण आणि संसर्गजन्य आजार नियंत्रण अशा विविध कामांचे ३३,६३१ रुपयांचे बिल ९ मे २०२१ रोजी त्यांच्या खात्यात जमा झाले होते.
हे प्रोत्साहन भत्ता बिल आपणच अंतिम तपासणी करून पुढे पाठवले आणि मंजूर करून दिले, असा दावा आरोपी सुदेश महाडोळे याने केला. तसेच या कामाच्या मोबदल्यात त्याने तक्रारदाराकडे ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.


तक्रारदाराची लाच देण्याची अजिबात इच्छा नसल्याने, त्यांनी थेट चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) धाव घेतली आणि १० जून २०२१ रोजी तक्रार नोंदवली.
तक्रारीची शहानिशा करून ACB च्या पथकाने आज, म्हणजेच १० जून रोजी ब्रम्हपुरी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात पंचांसमक्ष सापळा रचला. आरोपी सुदेश महाडोळे याने तक्रारदाराकडून ५ हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताच, त्याला रंगेहात ताब्यात घेण्यात आले. ४० वर्षीय आरोपी सुदेश महाडोळे हा कंत्राटी तत्त्वावर कार्यरत होता.

दरम्यान, ही यशस्वी कारवाई नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती माधुरी बावीस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूरचे पोलीस उपअधीक्षक अनिल जिल्हावार, पोलीस निरीक्षक सचिन धर्मेजवार आणि त्यांच्या पथकाने केली आहे. आरोपीला सध्या ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.