बल्लारपूर:- राजुरा तालुक्यातील सास्ती येथील रहिवासी रमेश लटारू गिरसावळे (वय ४८) यांचा मृतदेह वर्धा नदीच्या पात्रात आढळून आल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. रमेश लटारू गिरसावळे हे मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. दिनांक ८ जूनला ते घरातून बाहेर गेले होते. त्यानंतर ते घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला होता. मात्र त्यांचा काहीच पत्ता लागत नसल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, आज वर्धा नदीच्या परिसरात एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली. घटनास्थळी पोहोचून तपास केला असता तो मृतदेह रमेश लटारू गिरसावळे यांचा असल्याचे निष्पन्न झाले.
घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक शब्बीर पठाण, उपपोलीस निरीक्षक वैभव चव्हाण, तसेच हवालदार दयानंद झाडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. सदर प्रकरणी तक्रार बल्लारशा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.


