चंद्रपूर:- बाबूपेठ परिसरातील जुनोना चौकात सुरू असलेल्या अवैध मद्यपान अड्ड्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने आज सकाळी मोठी धाड टाकली आहे. हॉटेल बजेटमध्ये विनापरवाना ग्राहकांना बसवून मद्य पाजले जात होते. या कारवाईत वेगवेगळ्या ब्रँडची दारू, फ्रीज, कुलर आणि रोख रकमेसह मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
कारवाईदरम्यान मद्यप्राशन करणाऱ्या ११ ग्राहकांसह हॉटेलच्या मॅनेजरला रंगेहात पकडण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. सर्व ग्राहकांची वैद्यकीय तपासणी पॉझिटिव्ह आली आहे. मात्र, हॉटेल मालक आशिष चांदेकर हा कारवाईदरम्यान फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. ही धडक कारवाई राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनात भरारी पथक आणि चंद्रपूरच्या टीमने केली आहे. अवैध व्यवसायांवर अशीच कडक कारवाई सुरू राहील असा इशारा प्रशासनाने दिलाय.


