मुंबई:- राज्यातील शाळा सुरू होण्याच्या वेळापत्रकावरून सुरू असलेला घोळ संपण्याचे नाव घेत नाहीये. आधीच्या निर्णयाला 24 तास उलटत नाहीत तोच शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याबाबतचे आपले पूर्वीचे परिपत्रक रद्द केले आहे. मुंबई, पुण्यासह उर्वरित महाराष्ट्रात 15 जून आणि विदर्भासाठी 22 जून अशी तारीख जाहीर करण्यात आली होती, मात्र आता या संपूर्ण नियोजनात मोठा फेरबदल करण्यात आला आहे. शिक्षण संचालकांनी जारी केलेले आधीचे आदेश पत्र आता पूर्णपणे रद्द करण्यात आले आहे.
का बदलावा लागला निर्णय?
विदर्भातील प्रचंड उष्णता आणि कडक ऊन लक्षात घेता तेथील शाळा 15 जूनऐवजी सोमवारी 22 जूनपासून सुरू करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले होते. तसेच 22 जून ते 30 जून या कालावधीत विदर्भातील शाळा केवळ सकाळच्या सत्रात भरवण्याचे नियोजन करण्यात आले होते.
मात्र, या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले होते. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून शाळांच्या तारखा थेट पुढे ढकलल्या आहेत. आता उन्हाच्या तीव्रतेमुळे विदर्भातील शाळा थेट 30 जूनपासून सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.


