ACB Chandrapur: महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला ३ हजारांची लाच घेताना अटक!

चंद्रपूर:- सिंदेवाही येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या उपविभाग कार्यालयातील सहाय्यक अभियंता अमोद संतोष रंदये यांना अँटी करप्शन ब्युरोने लाच घेताना रंगेहात अटक केली आहे.

तक्रारदाराने प्रधानमंत्री सूर्यघर योजनेअंतर्गत दोन ग्राहकांच्या घरी सोलर सिस्टीम बसवून दिली होती. या सोलर सिस्टीमचे महावितरणच्या मीटरवर कनेक्शन जोडण्यासाठी 'रिलीज ऑर्डर' काढणे आवश्यक होते. हेच रिलीज ऑर्डर काढून देण्याच्या बदल्यात सहाय्यक अभियंता अमोद रंदये यांनी प्रत्येक ग्राहकाचे २ हजार याप्रमाणे एकूण ४ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी थेट चंद्रपूर एसीबी कार्यालयात तक्रार नोंदवली. आज, १ जुलै २०२६ रोजी एसीबीच्या पथकाने सिंदेवाही येथे सापळा रचला. तडजोडीअंती ३ हजार रुपयांची लाच स्वतः स्वीकारताच अमोद रंदये यांना पंचांसमक्ष रंगेहात ताब्यात घेण्यात आले.


ही यशस्वी कारवाई नागपूर लाप्रविच्या पोलीस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान, अपर पोलीस अधीक्षक माधुरी बावीस्कर यांच्या मार्गदर्शनात, चंद्रपूरचे पोलीस उपअधीक्षक अनिल जिट्टावार, पोलीस निरीक्षक प्रशांत केदार आणि त्यांच्या संपूर्ण सापळा पथकाने पार पाडली आहे. शासकीय कामासाठी कुणी लाच मागत असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन एसीबीने केले आहे.