चंद्रपूर:- दिल्लीतील जंतरमंतर येथे आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीचाराचे तीव्र पडसाद आता राज्यभरात उमटू लागले आहेत. याच कारवाईच्या निषेधार्थ आज चंद्रपुरात भव्य 'आक्रोश रॅली'चे आयोजन करण्यात आले होते.
महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष, विविध सामाजिक संघटना, तरुण आणि नागरिक या रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शहरातील मुख्य रस्त्यांवरून जात आंदोलकांनी केंद्र सरकार आणि पोलिसांच्या दडपशाहीविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी आपल्या पदाचा तातडीने राजीनामा द्यावा, अशी आक्रमक मागणी यावेळी करण्यात आली.
हातात बॅनर, तोंडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा आणि चेहऱ्यावर संताप... दिल्लीतील जंतरमंतर येथे NEET पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील अनियमिततेविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या बळाच्या वापरामुळे संपूर्ण देशभरात संतापाची लाट पसरली आहे. याचेच पडसाद आज चंद्रपूर शहरात पाहायला मिळाले.
या आक्रोश रॅलीत महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांसह विविध विद्यार्थी संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. शहरात मुख्य मार्गांवरून काढण्यात आलेल्या या रॅलीने संपूर्ण परिसर दणाणून सोडला. विद्यार्थ्यांनी आपल्या भविष्याशी खेळणाऱ्या आणि आवाज दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्या हुकूमशाही प्रवृत्तीचा धिक्कार केला. विद्यार्थ्यांचा हा आक्रोश दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालला असून, आता केंद्र सरकार यावर काय पावले उचलणार आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे कसे पाहणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

