राजुरा:- सोशल मीडियावरील ओळखीचा गैरफायदा घेत एका २२ वर्षीय युवकाने अवघ्या १३ वर्षांच्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी राजुरा पोलिसांनी वेगाने पावले उचलत मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
राजुरा शहरापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या एका गावात ही दुर्दैवी घटना घडली. आरोपी युवकाने फेसबुकच्या माध्यमातून या १३ वर्षीय चिमुरडीला आधी फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. त्यानंतर दोघांमध्ये चॅटिंग सुरू झाले. ओळखीचा गैरफायदा घेत २५ जून २०२६ रोजी आरोपी अरबाज चाऊस याने मुलीला राजुरा येथे बोलावून घेतले.
तिथून तो तिला आपल्या एका मित्राच्या घरी घेऊन गेला. 'माझे तुझ्यावर प्रेम आहे' असे सांगत त्याने या चिमुरडीवर जबरीने अत्याचार केला. या धक्कादायक प्रसंगामुळे पीडित मुलगी प्रचंड घाबरली होती. मात्र, काही दिवसांनी तिने धीर धरत आपल्या पालकांना घडलेला सर्व प्रकार सांगितला.
मुलीच्या पालकांनी तातडीने राजुरा पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. घटनेचे गांभीर्य ओळखून राजुरा पोलिसांनी ५ जुलै रोजी रात्रीच आरोपीविरुद्ध बलात्कार आणि 'पोक्सो' (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. राजुरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार नितीन चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत आरोपी अरबाज चाऊस याला अटक केली आहे.
सोशल मीडियाचा वापर करताना मुलांवर पालकांचे लक्ष असणे किती गरजेचे आहे, हेच या घटनेवरून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास राजुरा पोलीस करत आहेत.

