Chandrapur police: चंद्रपुरात एकाच नंबर प्लेटवर दोन गाड्यांची धाव!

Bhairav Diwase
८१ लाखांच्या अवैध वाळू वाहतूक रॅकेटचा पोलिसांकडून पर्दाफाश
चंद्रपूर:- दोन वेगवेगळ्या वाहनांवर एकच नोंदणी क्रमांक (नंबर प्लेट) आणि एकाच ई-टीपी (e-TP) चा वापर करून शासनाचा लाखोंचा महसूल बुडवणाऱ्या एका मोठ्या अवैध वाळू वाहतूक रॅकेटचा चंद्रपूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. स्थानिक गुन्हे शाखा (LCB), रामनगर पोलीस आणि भद्रावती पोलिसांनी संयुक्तपणे केलेल्या या कारवाईत तब्बल ८१ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


नाकाबंदीत झाला भांडाफोड:

०७ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास गस्त घालत असताना रामनगर पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती की, मूल ते चंद्रपूर मार्गाने दोन वाहने एकाच नंबर प्लेटचा वापर करून अवैध रेती वाहतूक करत आहेत. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने नागपूर मार्गावर नाकाबंदी केली.
 
पहिली गाडी (१२ चाकी हायवा): रात्री ३.०० वाजताच्या सुमारास संशयास्पद वेगाने येणाऱ्या हायवा ट्रकला (MH-34-BZ-8114) थांबवण्याचा इशारा केला असता, चालकाने गाडी नागपूरच्या दिशेने भरधाव पळवली. पोलिसांनी तात्काळ पाठलाग करत भद्रावती पोलिसांच्या मदतीने घोडपेठ येथे ही गाडी पकडली.

दुसरी गाडी (१६ चाकी ट्रक): अवघ्या अर्ध्या तासानंतर (रात्री ३.३० वाजता) दुसरी १६ चाकी गाडी (MH-34-BZ-8114) नाकाबंदीत थांबवण्यात आली.


तपासणीदरम्यान दोन्ही वाहनांवर 'MH-34-BZ-8114' हा एकच नोंदणी क्रमांक आणि दोन्ही गाड्यांमध्ये एकच ई-टीपी क्रमांक (33198347) वापरला जात असल्याचे उघडकीस आल्याने पोलीसही चक्रावून गेले.


जप्त करण्यात आलेला मुद्देमाल (एकूण ₹८१,१०,०००/-)

टाटा १६ चाकी ट्रक (४८३० टी. के.): किंमत ₹४५ लाख + ११ ब्रास रेती (किंमत ₹५५ हजार)

टाटा १२ चाकी हायवा/टिप्पर (३५३२ टी. के.): किंमत ₹३५ लाख + ११ ब्रास रेती (किंमत ₹५५ हजार)

आरोपींवर गुन्हे दाखल:

या प्रकरणी खालील आरोपींविरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायिक संहिता (BNS), महाराष्ट्र जमीन महसूल संहिता आणि खाण व खनिज कायद्याच्या विविध कलमांन्वये गुन्हे नोंदवण्यात आले आहेत:
1) स्वप्निल सुरेश कबडे (वय ३७, रा. सावजी नगर, वर्धा) – चालक (१६ चाकी)
2) रामकेश राजेश केवट (वय २०, रा. सीधी, मध्य प्रदेश) – चालक (१२ चाकी)
3) रोहन चाफले (रा. खांबाळा, ता. वरोरा, जि. चंद्रपूर) – वाहन मालक

सदर धडक कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी व अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व रामनगर पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.