Chimur News: सेवादलाचा पारंपरिक कार्यक्रम पालिकेने 'पळवला'?

Bhairav Diwase
नगरपालिकेसमोर स्वातंत्र्यसैनिकांसह कार्यकर्त्यांचा ठिय्या!
चिमूर:- स्वातंत्र्यसंग्रामाचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या चिमूर शहरात यंदाच्या ध्वजारोह कार्यक्रमावरून मोठा राजकीय आणि सामाजिक वाद पेटला आहे. स्वातंत्र्यापासून चालत आलेली ८० वर्षांची परंपरा तोडत चिमूर नगरपालिकेने काँग्रेस सेवादलाच्या पारंपरिक ठिकाणी ध्वजारोहण केल्याने चिमूरमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.


नेमका वाद काय आहे?

चिमूर येथील ऐतिहासिक किल्ला परिसरात स्वातंत्र्य मिळाल्यापासून दरवर्षी काँग्रेस सेवादलाच्या वतीने ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. या कार्यक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे देशसेवेसाठी लढा दिलेल्या स्वातंत्र्य संग्राम सैनिकांच्या हस्ते हा तिरंगा फडकवला जात असे. यंदाही नेहमीप्रमाणे सेवादलाकडून सकाळी साडेनऊ वाजताच्या ध्वजारोहणासाठी सर्व तयारी पूर्ण करण्यात आली होती. परंतु, सेवादलाचे कार्यकर्ते आणि स्वातंत्र्यसैनिक पोहोचण्यापूर्वीच नगरपालिका प्रशासनाने त्या ठिकाणी अचानक स्वतः ध्वजारोहण उरकून घेतले.


प्रशासनाविरोधात ठिय्या आंदोलन

नगरपालिकेच्या या मनमानी कारभाराची माहिती मिळताच काँग्रेस आणि सेवादलाचे कार्यकर्ते अत्यंत आक्रमक झाले. ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकांसह कार्यकर्त्यांनी थेट चिमूर नगरपालिकेवर धडक दिली आणि कार्यालयासमोरच ठिय्या आंदोलन सुरू केले.


कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, जर पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना स्वतः ध्वजारोहण करायचे होते, तर त्यांनी सेवादलाला आधी पूर्वकल्पना द्यायला हवी होती. आमचे पारंपरिक नियोजन पायदळी तुडवून प्रशासनाने शहरात सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणातील दोषींवर तातडीने कारवाई झाली पाहिजे.

पोलिसांचा बंदोबस्त तैनात:

घटनेचे गांभीर्य ओळखून आणि परिसरातील वाढता तणाव लक्षात घेता पोलीस ताफा तातडीने घटनास्थळी दाखल झाला आहे. सध्या पोलीस प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असून, आंदोलकांशी चर्चा करून वाद मिटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

प्रशासनाच्या या भूमिकेमुळे चिमूरमधील नागरिकांमधून आणि राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.