चंद्रपूर:- पावसाळा सुरू होताच निसर्गाची वेगवेगळी रूपं आपल्याला पाहायला मिळतात. सध्या चिमूर तालुक्यातील वाघाई पहाडावरून कोसळणारा 'मुक्ताई धबधबा' पर्यटकांना भुरळ घालत आहे. हिरवीगार वनराई आणि डोंगरदऱ्यांच्या कुशीत वसलेल्या या धबधब्याचे सौंदर्य पाहून पर्यटकांच्या मुखातून आपसूकच उद्गार निघत आहेत... काय तो डोंगर, काय ती झाडी अन् काय तो धबधबा!
मुसळधार पाऊस जसा वाढतोय, तसतसं चिमूर तालुक्यातील मुक्ताई धबधब्याचं सौंदर्य अधिकच बहरताना दिसतंय. चंद्रपूर जिल्ह्यातील माना समाजाचे मुख्य श्रद्धास्थान असलेले 'मुक्ताई मंदिर' याच वाघाई पहाडावर वसलेले आहे. डोमा गावापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या या क्षेत्रात सध्या पर्यटकांची तुफान गर्दी पाहायला मिळतेय. दरवर्षी पावसाळ्यात हा धबधबा ओसंडून वाहतो आणि विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या पर्यटकांचे मन जिंकून घेतो.

