पोंभूर्णा:- पोंभूर्णा येथील वनविभागाच्या व्हीआयपी विश्रामगृहामागील कक्ष क्रमांक ९५ (ब) परिसरातील जंगलात असलेल्या तलावात एक चितळ मृतावस्थेत आढळून आले आहे. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून मृत चितळाला तलावातून बाहेर काढले आणि आपल्या ताब्यात घेतले. प्राथमिक प्रक्रियेनंतर या चितळाला पुढील वैद्यकीय तपासणी आणि शवविच्छेदनासाठी चंद्रपूर येथील वन्यप्राणी उपचार केंद्रात (TTC) हलवण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शवविच्छेदन प्रक्रिया पार पडल्यानंतर मृत चितळावर रीतसर दहन संस्कार करण्यात आले.
या घटनेबाबत माहिती देताना पोंभूर्णाचे वन परिक्षेत्र अधिकारी अनंत राखुंडे म्हणाले चितळ हा जंगलातील अत्यंत भित्रा प्राणी मानला जातो. जंगलातीलच एखाद्या हिंस्त्र प्राण्याने पाठलाग केल्यामुळे घाबरून हे चितळ स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पाण्यात शिरले असावे आणि तिथेच त्याचा मृत्यू झाला असावा, असा आमचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, मृत्यूचे नेमके आणि खरे कारण शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच स्पष्ट होईल.
या संपूर्ण कारवाईदरम्यान क्षेत्रसहायक एस. आर. यादव, वनरक्षक प्रतीक बोबडे आणि वनमजूर उपस्थित होते. चितळाचा मृत्यू नैसर्गिक कारणाने झाला की यामागे अन्य काही कारण आहे, याचा शोध आता शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच लागणार आहे. वनविभागाने या घटनेची नोंद घेतली असून पुढील आवश्यक कार्यवाही सुरू आहे.
