गोंडपिपरी:- एका वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान मद्यधुंद अवस्थेत झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हॉटेलमध्ये ग्राहकांना त्रास होऊ नये म्हणून मध्यस्थी करायला गेलेल्या हॉटेल मालकावरच आरोपींनी जीवघेणा हल्ला चढवला. गोंडपिपरी तालुक्यातील सुरगाव शिवारातील 'फलके भोजनालया'त ही घटना घडली असून, हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (CCTV) कैद झाला आहे.
काय घडलं नेमकं?
सुरगाव शिवारातील फलके भोजनालयात मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी काही तरुण आले होते. जेवणादरम्यान दारूच्या नशेत असलेल्या तीन तरुणांमध्ये आपसात शाब्दिक वाद सुरू झाला. वाद वाढत असल्याने हॉटेलमधील इतर ग्राहकांना त्याचा त्रास होऊ नये, या उद्देशाने हॉटेल मालक दीपक फलके आणि आतिश फलके यांनी मध्यस्थी करत त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, समज देण्यावरून मद्यधुंद तरुणांचा राग अनावर झाला. त्यांनी हॉटेल मालक व कर्मचाऱ्यांवर खुर्च्यांनी थेट हल्ला चढवला. या हल्ल्यात दीपक फलके आणि आतिश फलके हे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत.
कुकच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला!
मारहाण इतकी भीषण होती की हॉटेल मालकाच्या जिवाला धोका निर्माण झाला होता. परंतु, हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कुकने (आचारी) प्रसंगावधान दाखवत वाद घालणाऱ्या मद्यधुंद तरुणांच्या डोळ्यांत मिरचीची पूड (तिखट) टाकली. यामुळे आरोपींचे नियंत्रण सुटले आणि पुढील मोठा अनर्थ टळला. कुकने दाखवलेल्या या धाडसामुळे हॉटेल मालकाचा जीव वाचला.
तिघांवर गुन्हा दाखल:
या प्रकरणी गोंडपिपरी पोलीस ठाण्यात तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रोशन प्रभाकर कष्टी (वय २७)
अनिकेत देवराव गोहणे (वय २५)
चेतन राजू वांढरे (वय १९)
घटनेचा पुढील अधिक तपास पोलीस निरीक्षक करत आहेत.
