sardar Patel Mahavidyalaya: सरदार पटेल महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा

Bhairav Diwase
गुणवंत खेळाडूंचा सत्कार!

चंद्रपूर:- येथील सरदार पटेल महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दरम्यान यानिमित्ताने महाविद्यालयातील गुणवंत खेळाडूंच्या सत्कार सोहळा थाटात पार पडला. 


या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून आंतरराष्ट्रीय योग खेळाडू डॉ. पूजा देऊरकर यांच्यासह महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. स्वप्नील माधमशेट्टीवार, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. प्रमोद कुचनकर, कला विभाग प्रमुख डॉ. सुनीता बनसोड, विज्ञान विभाग प्रमुख डॉ. विजय वाढई, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. राहुल सावलीकर, शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. कुलदीप आर. गोंड, डॉ. पुष्पांजली कांबळे, कनिष्ठ महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण शिक्षक प्रा. विक्की पेटकर प्रामुख्याने उपस्थित होते. 


कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून तसेच मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली. राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयातील विविध क्रीडा प्रकारांमध्ये उल्लेखनीय व यशस्वी कामगिरी करणाऱ्या १५० गुणवंत खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते ब्लेझर व ट्रॅकसूट प्रदान करून गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला.

यावेळी उपप्राचार्य डॉ. स्वप्नील माधमशेट्टीवार यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्राचे महत्त्व अधोरेखित केले. प्रमुख अतिथी आंतरराष्ट्रीय योग खेळाडू डॉ. पूजा देऊरकर यांनी आपल्या प्रेरणादायी मार्गदर्शनातून खेळाडूंना सातत्यपूर्ण सराव, शिस्त, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या बळावर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन करण्याचे आवाहन केले.

अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी .एम. काटकर यांनी सर्व गुणवंत खेळाडूंचे अभिनंदन करून, क्रीडा क्षेत्र विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले. महाविद्यालयातील खेळाडूंनी भविष्यात अधिक मेहनत घेऊन महाविद्यालय, जिल्हा व राज्याचे नाव उज्ज्वल करावे, असे त्यांनी आवाहन केले.

कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक डॉ. कुलदीप आर. गोंड यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. विक्की पेटकर यांनी केले. या कार्यक्रमाला प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, खेळाडू व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राजू इंगोले, हनमंतू डंभारे, राहुल रामटेके, तसेच स्वयंसेवक रोशन चौधरी, गौरव झाडे, आदित्य मंगरूळकर आणि सर्व खेळाडूंनी अथक परिश्रम घेतले.                         

दरम्यान सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविंद पोरेड्डीवार, कार्याध्यक्ष आ. किशोर जोरगेवार, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सगुणा तलांडी, सचिव प्रशांत पोटदुखे, कोषाध्यक्ष संदीप गड्डमवार, सर्वोदय शिक्षण मंडळचे कार्यकारी सदस्य राकेश पटेल, शेख रमजान, सुरेश पोटदुखे, जीनेश पटेल यांनी उपरोक्त उपक्रमाबद्दल शुभेच्छा दिल्यात.