चंद्रपूर:- आदिवासी विकास विभागाने जारी केलेल्या वसतीगृहांच्या नव्या परिपत्रकाची! या परिपत्रकावर कॉंग्रेसचे नेते आ. विजय वडेट्टीवार प्रचंड संतापले असून, त्यांनी थेट राज्य सरकारला धारेवर धरलं आहे. आदिवासी भागातील अत्यंत गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळे निर्माण करणारा हा निर्णय असल्याचा आरोप वडेट्टीवारांनी केला आहे.
आदिवासी विकास विभागामार्फत राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना वसतीगृहांची सुविधा दिली जाते. मात्र, नुकत्याच निर्गमित करण्यात आलेल्या परिपत्रकातील कडक अटी आणि नियमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. याच मुद्द्यावरून विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
शासनाने काढलेलं हे परिपत्रक म्हणजे आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा हक्क हिरावून घेण्याचा प्रकार आहे. आधीच वसतीगृहांची दुरवस्था झाली आहे, जेवणाचा दर्जा खालावला आहे. पायाभूत सुविधा देता येत नाहीत आणि वरून विद्यार्थ्यांनाच अडचणीत आणणारे नियम लादले जात आहेत! हे परिपत्रक तात्काळ रद्द झालं पाहिजे, नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिला.
