Action taken against DJ: गणेशोत्सवाच्या आगमनात १२३.०५ डेसिबलचा कर्णकर्कश आवाज

Bhairav Diwase
D.J. आणि वाहन जप्त; पोलीस प्रशासनाचा दणका

चंद्रपूर:- जिल्ह्यात गणेशोत्सवाच्या आगमनादरम्यान न्यायालयाचे आणि पोलीस प्रशासनाचे नियम पायदळी तुडवणाऱ्यांवर आता पोलिस कठोर झाले आहेत. दुर्गापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत विनापरवाना आणि निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त आवाजात D.J. (ध्वनीक्षेपक) वाजविणाऱ्या एका चालकावर पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल साडेतेरा लाख रुपयांचे साहित्य जप्त केले आहे.


दिनांक १४ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास पोस्टे दुर्गापूरचे पथक गस्तीवर असताना, कोंडी वार्ड क्र. ६, उर्जानगर नेरी येथे गणेशोत्सवाच्या आगमनादरम्यान D.J. चा अत्यंत तीव्र आवाज येत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक शेगावकर आणि पथकाने ध्वनीमापक यंत्राद्वारे (Decibel Meter) D.J. च्या आवाजाची तपासणी केली. यावेळी आवाजाची तीव्रता १०५.५ डेसिबल आढळल्याने पोलिसांनी पंचांसमक्ष तात्काळ सूचना देऊन स्टेशन डायरीमध्ये नोंद केली.

मात्र, काही वेळातच संबंधित D.J. चालकाने पुन्हा एकदा अतिशय तीव्र आवाजात D.J. सुरू ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस हवालदार भोयर, पोलीस शिपाई हरीश तलांडे व पथकाने पंचांसह घटनास्थळी पुन्हा धाव घेतली.


नियमभंग आणि आवाजाची उच्च मर्यादा:

घटनास्थळी जाऊन पुन्हा ध्वनीमापक यंत्राने तपासणी केली असता, आवाजाची तीव्रता तब्बल १२३.०५ डेसिबल इतकी प्रचंड असल्याचे निष्पन्न झाले. तसेच, या डी.जे. चालकाकडे कोणतीही परवाना किंवा परवानगी नसल्याचे समोर आले. पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांनी कलम ३८ मपोका अन्वये दिलेला आदेश लागू असतानाही त्याचे उघडपणे उल्लंघन करण्यात आले.


जप्त करण्यात आलेल्या साहित्याचा तपशील:

पोलिसांनी पंचनाम्यादरम्यान खालीलप्रमाणे मुद्देमाल जप्त केला आहे:
अंप्लिफायर (Amplifier): शार्प ऑडिओ, मॉडेल नं. MT 1201 (किंमत - १,००,००० रुपये)
स्पीकर (Speaker): संख्या २, टॉप १ (किंमत - ४,५०,००० रुपये)
 डी.जे. मिक्सर (D.J. Mixer): डायनाटेक (किंमत - १,००,००० रुपये)
 इतर साहित्य: जनरेटर १५ केव्ही, पार्क लाईट (किंमत - १,००,००० रुपये)
वाहन: महिंद्रा सुप्रो (क्र. MH 34 CQ 3494) किंमत 6,00,000 रुपये.
 
एकूण जप्त साहित्याची व वाहनाची अंदाजे किंमत: १३,५०,००० रुपये


गुन्हा दाखल व कायदेशीर कारवाई:

सदर डी.जे. चालक अमन गंगाधर गोहणे (रा. बाबराळा, ता. मूल, जि. चंद्रपूर) याने सार्वजनिक शांतता भंग करत नियमांचे उल्लंघन केल्यामुळे त्याचे कृत्य महाराष्ट्र पोलीस अधिनियम (मपोका) कलम १३६, ७० अन्वये गुन्हेगारी स्वरूपाचे ठरत असल्याने त्याच्याविरुद्ध दुर्गापूर पोलीस ठाण्यात कायदेशीर फिर्याद नोंदवून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक आयूष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि शेगावकर, पोलीस उपनिरीक्षक पंकज वासाडे, पोहवा ११२३ भोयर आणि पोलीस शिपाई तलांडे (१०६८) यांनी पार पाडली.


पोलिसांचा इशारा:

सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या, विनापरवाना D.J. वाजवून सर्वोच्च न्यायालय व प्रशासकीय नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढेही अशीच धडक कारवाई चालूच राहणार असल्याचा स्पष्ट इशारा चंद्रपूर पोलिसांनी दिला आहे.