Chandrapur News: चंद्रपुरात बालगोपाळांच्या उत्साहात तान्हा पोळा साजरा

Bhairav Diwase

चंद्रपूर:- बालगोपाळांचा उत्साह आणि पारंपरिक वातावरणात चंद्रपुरात तान्हा पोळा मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला. यावेळी माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार व महापौर संगीता खांडेकर यांची विशेष उपस्थिती होती. 


चिमुकल्यांनी आकर्षक पद्धतीने सजवलेले लाकडी नंदीबैल हातात घेऊन तान्हा पोळा उत्सवात मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. त्यांच्या उपस्थितीने गांधी चौक परिसरात उत्सवी वातावरण निर्माण झाले होते. चंद्रपूर शहरातील गांधी चौक येथे जे.सी.आय. यांच्या वतीने विशेष तान्हा पोळा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.


यावेळी सामाजिक विषयांवर जनजागृती करणारे विविध देखणे आणि आकर्षक चित्ररथ सादर करण्यात आले. या चित्ररथांच्या माध्यमातून नागरिकांना विविध सामाजिक संदेश देण्यात आले. उत्कृष्ट चित्ररथांची निवड करून त्यांना सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.


बालगोपाळांचा उत्साह, सजवलेले नंदीबैल आणि सामाजिक संदेश देणारे चित्ररथ यामुळे गांधी चौक परिसरात तान्हा पोळ्याचा उत्साह पाहायला मोठी गर्दी झाली होती.