Fire Brigade Chandrapur: ३० तास, ३० जवान अन् ५० दुकाने आगीच्या मुखातून वाचले!

Bhairav Diwase

चंद्रपूर:-
चंद्रपूर शहराच्या मध्यवर्ती भागातील रघुवंशी कॉम्प्लेक्स येथे सकाळच्या सुमारास एका दुकानात लागलेल्या भीषण आगीवर चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या विविध विभागांनी तब्बल ३० तासांहून अधिक काळ अथक प्रयत्न करून यशस्वी नियंत्रण मिळवले आहे.


या ५० दुकानांच्या संपूर्ण संकुलाला मोठा धोका निर्माण झाला होता. मात्र, मनपाच्या पथकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे ही आग केवळ एकाच दुकानापुरती मर्यादित ठेवण्यात मोठे यश आले असून, संभाव्य मोठी दुर्घटना टळली आहे.


या संपूर्ण आपत्कालीन बचावकार्यात अग्निशमन विभागातील सुमारे ३० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अत्यंत धाडसाने लढा दिला. यामध्ये राहुल पंचबुद्धे आणि चिवंडे यांनी स्वतः धोक्यात घालून प्रत्यक्ष घटनास्थळी महत्त्वाची कामगिरी बजावली. याशिवाय, अतिक्रमण विभागाचे मनीष शुक्ला यांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी, यांत्रिकी विभागाचे चेतन्य चौरे यांनी अग्निशमन वाहनांना पाण्याचा अखंड पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी, तर विद्युत विभागाच्या प्रगती भुरे यांनी रात्रीच्या वेळी हॅलोजन लाईट्सची व्यवस्था करून मोलाचे सहकार्य केले. आग पूर्णपणे आटोक्यात आल्यानंतर स्वच्छता विभागाचे गर्गेलवार व त्यांच्या पथकाने जळालेला कचरा आणि साहित्य तातडीने हटविले.


या बचावकार्यात सहभागी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी भंडारपाल विभागाचे अहेमद सिद्धिकी यांनी भोजन व नाश्त्याची चोख व्यवस्था केली, तर डीडीएमओ (DDMO) सलीम शेख यांनी घटनास्थळी प्रत्यक्ष उपस्थित राहून यंत्रणेला सक्रिय सहकार्य केले.


प्रशासकीय आणि दंडात्मक कारवाई:

आग पूर्णपणे नियंत्रणात आल्यानंतर, प्रशासनाने कडक पावले उचलत रघुवंशी कॉम्प्लेक्समधील २२ आस्थापनाधारकांना मनपातर्फे नोटिसा बजावल्या असून नियमानुसार पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू केली आहे. तसेच, ज्या ‘मेसर्स इंडियन मेडिकल एजन्सी’च्या दुकानातून ही आग लागली, त्यासंबंधित संस्थेविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची व दंडात्मक कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.


मनपा आयुक्त अकुनूरी नरेश यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विभागप्रमुखांनी आणि कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या उत्कृष्ट समन्वयामुळेच चंद्रपूर शहरात एक मोठा अनर्थ टाळणे शक्य झाले आहे.