Gadchandur Municipal Council: गडचांदूरमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष

Bhairav Diwase
नगरपरिषदेने इमारतीचा ९१ लाखांचा निधी वळवला आपत्कालीन कामांसाठी!
कोरपना:- चंद्रपूर जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने सिंचन प्रकल्प आणि धरणांच्या पाणीपातळीत मोठी घट झाली आहे. याचा थेट परिणाम पाणीपुरवठ्यावर होत असून, संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी गडचांदूर नगरपरिषदेने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नगरपरिषदेच्या नवीन इमारतीसाठी आलेला तब्बल ९१ लाखांचा निधी आता आपत्कालीन कामांसाठी वळविण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष निलेश ताजणे यांनी दिली.


सप्टेंबरचा पहिला आठवडा संपत आला तरी चंद्रपूर जिल्ह्यात अपुरा पाऊस झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या केवळ ५०.३ टक्के पावसाची नोंद झाली आहे. गडचांदूर शहरालगत असलेल्या अमलनाला धरणातील पाणीपातळी झपाट्याने कमी होत असून, या धरणावरून गडचांदूर शहर आणि परिसरातील २४ गावांची तहान भागवली जाते. तसेच, अंबुजा आणि अल्ट्राटेकसारखे मोठे सिमेंट उद्योग आणि रब्बी हंगामातील शेतीसुद्धा याच धरणावर अवलंबून आहे.


परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत गडचांदूर नगरपरिषदेने प्रशासकीय इमारतीसाठी प्राप्त झालेला ९१ लाख रुपयांचा निधी आपत्कालीन पाण्याच्या कामांसाठी वळवला आहे. यासोबतच धरणातील पाणी केवळ पिण्यासाठी आरक्षित करण्याची मागणीही प्रशासनाकडे करण्यात आली आहे.