सावली:- तालुक्यातील केशरवाही येथे घरगुती वादातून एका भावाने दुसऱ्या भावाच्या डोक्यात काठीने प्रहार केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या भावाचा नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, या प्रकरणी सावली पोलिसांनी आरोपी भावाला अटक केली आहे.
काय आहे नेमकी घटना?
आशिष भोयर (वय २५) आणि रुपेश भोयर (वय २२) असे दोघे भाऊ केशरवाही येथे राहतात. सोमवारी (दि. २१) सायंकाळी सात वाजताच्या सुमारास आशिषचा आपल्या आईसोबत घरगुती कारणावरून वाद सुरू होता. हा वाद सोडवण्यासाठी धाकटा भाऊ रुपेश तिथे आला. मात्र, संतापलेल्या आशिषने त्याच्याशीही हुज्जत घातली. वाद विकोपाला गेल्याने रुपेशने आशिषला समजावण्याचा प्रयत्न केला आणि रागारागात काठी उगारली. मात्र, तो फटका चुकून थेट आशिषच्या डोक्यावर बसल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला.
उपचारादरम्यान मृत्यू आणि पोलिसांची कारवाई:
घटनेनंतर जखमी आशिषला तात्काळ सावलीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला गडचिरोली आणि तेथून पुढील उपचारासाठी नागपूरला हलवण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, भाऊ गंभीर जखमी असताना आरोपी रुपेश स्वतः त्याच्यासोबत रुग्णालयात उपस्थित होता. या प्रकरणी सावली पोलिसांनी त्वरित कारवाई करत आरोपी रूपेश भोयर याला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

