नागपूर:- धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून भीमाची लेकर ऑर्गनायझेशन, नागपूर, महाराष्ट्र यांच्या वतीने मंगळवार, दिनांक २० ऑक्टोबर २०२६ रोजी अभ्युदय भोजन सोहळा, अहिल्याबाई होळकर चौक, अजनी रेल्वे स्टेशनसमोर, नागपूर येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांतर्गत भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन, संविधानाच्या प्रतींचे निःशुल्क वितरण, मान्यवरांचे मार्गदर्शन, ग्रंथपाल बांधवांचा सन्मान तसेच देशाच्या विविध भागांतून दीक्षाभूमीवर आलेल्या बौद्ध अनुयायांसाठी भोजनदानाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शासकीय विज्ञान संस्थेचे डॉ. रामदास लिहितकर होते, तर उद्घाटक म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ग्रंथालय व माहितीशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. सत्यप्रकाश निकोसे उपस्थित होते.
या कार्यक्रमाला चंद्रपूर येथील प्रा. डॉ. प्रमोद शंभरकर, मुंबई येथील आयु. बोधणकर साहेब आणि आयु. सुरेश गजभिये यांची विशेष उपस्थिती लाभली. तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर, ग्रंथपाल, सामाजिक कार्यकर्ते आणि संघटनेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आलेले अतिरिक्त पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त (वाहतूक विभाग) आदित्य मिरखेळकर आणि जुनी पेन्शन संघटना, महाराष्ट्र राज्याचे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर हे शासकीय कामाच्या तसेच कार्यक्रमातील व्यस्ततेमुळे उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांनी आयोजकांना शुभेच्छा संदेश पाठवून कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.
यावेळी दूरसंचार विभागाचे मुंबई–गोवा येथील माजी डेप्युटी डायरेक्टर जनरल सुनील तलवारे, राज्य वस्तू व सेवा कर विभागाच्या उपायुक्त शीला मेश्राम, समाजसेविका अश्विनी लिल्हारे (फुलमाळी) आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ. श्रीकांत भोवते यांना प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून निमंत्रित करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेच्या सामूहिक वाचनाने झाली. आयु. कल्पना मुकुंदे यांनी उद्देशिकेचे वाचन केले. त्यानंतर उपस्थितांना भारतीय संविधानाच्या प्रतींचे निःशुल्क वितरण करण्यात आले. संविधानातील न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूलभूत मूल्यांचा समाजातील प्रत्येक घटकापर्यंत प्रसार व्हावा आणि नागरिकांमध्ये संविधानाविषयी जागरूकता निर्माण व्हावी, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता.
दीक्षाभूमीवर, धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूर येथील ऐतिहासिक दीक्षाभूमीवर देशाच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने बौद्ध अनुयायी दाखल झाले होते. या अनुयायांची सेवा करण्याच्या सामाजिक बांधिलकीतून भीमाची लेकरे ऑर्गनायझेशनतर्फे भोजनदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. देशाच्या विविध भागांतून आलेल्या बौद्ध अनुयायांसह दीक्षाभूमीवर उपस्थित असलेल्या नागरिकांनी या भोजनदानाचा लाभ घेतला.
संविधानाचा सन्मान, धम्माचा विचार आणि मानवसेवेचा संस्कार यांचा संगम असलेल्या या उपक्रमातून सामाजिक समता, बंधुभाव आणि मानवकल्याणाचा संदेश देण्यात आला. भोजनदानाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत संविधानाच्या निःशुल्क वितरणाद्वारे जनजागृती करण्याचा संघटनेचा प्रयत्न उपस्थितांनी कौतुकास्पद मानला.
या कार्यक्रमात ग्रंथालय क्षेत्रात ज्ञानप्रसार, वाचनसंस्कृतीची जोपासना आणि शैक्षणिक विकासासाठी योगदान देणाऱ्या ग्रंथपाल बांधवांचा सन्मान व सत्कार करण्यात आला. ग्रंथालये ही ज्ञानाची केंद्रे असून समाजाच्या वैचारिक आणि शैक्षणिक प्रगतीमध्ये ग्रंथपालांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे, हा विचार या उपक्रमातून अधोरेखित करण्यात आला.
कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून डॉ. सिद्धार्थ वाकुडे आणि आयु. मंगेश वागदे यांनी जबाबदारी पार पाडली. सूत्रसंचालन आयु. सारिका पाटील आणि आयु. नितेश मोटघरे यांनी केले, तर डॉ. ज्योत्स्ना वाकुडे-मून यांनी आभार प्रदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी भीमाची लेकर ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष डॉ. दिलीप पाटील, सचिव डॉ. संजय रायबोले, कोषाध्यक्ष डॉ. चंद्रमणी गजभिये यांच्यासह संघटनेच्या सर्व पदाधिकारी, सदस्य आणि सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त संविधानाचे निःशुल्क वितरण, ग्रंथपाल बांधवांचा सन्मान आणि बौद्ध अनुयायांसाठी भोजनदान अशा विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून भीमाची लेकर ऑर्गनायझेशनने संविधानिक मूल्ये, सामाजिक समता आणि मानवसेवेचा संदेश समाजापर्यंत पोहोचविला.


