पोंभूर्णा:- कर्तव्य बजावत असतानाच काळाने घाला घातला अन् एका कर्तव्यनिष्ठ जवानाची जीवनयात्रा संपली. पोंभूर्णा तालुक्यातील देवाडा खुर्द येथील रहिवासी तथा होमगार्ड म्हणून सेवा बजावणारे सुभाष मंडरे (वय ५०) यांचे शनिवारी (दि. २४ ऑक्टोबर) दुपारी तीन वाजताच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. कर्तव्यावर असतानाच त्यांची प्राणज्योत मालवल्याने पोलीस व होमगार्ड दलासह देवाडा खुर्द गावावर शोककळा पसरली. रविवारी (दि. २५ ऑक्टोबर) देवाडा खुर्द येथील नदीघाटावर त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलिसांनी बंदुकीच्या फैरी झाडून त्यांना अखेरची मानवंदना दिली.
सुभाष मंडरे हे पोंभूर्णा पोलीस ठाण्यात होमगार्ड म्हणून कार्यरत होते. नेहमीप्रमाणे कर्तव्य बजावत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. यातच त्यांची प्राणज्योत मालवली. कर्तव्यावर असतानाच मृत्यूने गाठल्याची बातमी समजताच त्यांच्या सहकाऱ्यांना मोठा धक्का बसला. गावातील परिचित व्यक्तिमत्त्व हरपल्याने देवाडा खुर्द परिसरातही हळहळ व्यक्त करण्यात आली.
रविवारी देवाडा खुर्द येथील नदीघाटावर शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोंभूर्णा पोलीस ठाण्याचे ठाणेदार राहुल ठेंगणे, पोलीस उपनिरीक्षक भूषण पाटील, होमगार्ड निरीक्षक ढोबळे, पोलीस कर्मचारी, होमगार्ड जवान, नातेवाईक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलिसांकडून बंदुकीच्या फैरी झाडून शासकीय इतमामात त्यांना अखेरची मानवंदना देण्यात आली. आपल्या सहकाऱ्याला अखेरचा निरोप देताना उपस्थितांचे डोळे पाणावले होते.
सुभाष मंडरे यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आणि वडील असा परिवार आहे. कर्तव्य बजावताना जीवनाची अखेर झालेल्या या जवानाला शासकीय इतमामात निरोप देण्यात आला; मात्र त्यांच्या अकाली जाण्याने निर्माण झालेली पोकळी कुटुंबीयांसह सहकाऱ्यांच्या मनात कायम राहणार आहे.


