Railway : रेल्वे प्रवाशांनो, रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत मोबाइल चार्जिंग करता येणार नाही!

Bhairav Diwase
लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवासात रात्री मोबाईल चार्जिंगला लावून झोपण्याची सवय असलेल्या प्रवाशांना आता काळजी घ्यावी लागणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने रात्री ११ ते पहाटे ५ या वेळेत रेल्वे डब्यांमधील मोबाईल चार्जिंग पॉइंट बंद ठेवण्याच्या नियमाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश रेल्वे बोर्डाने सर्व विभागीय रेल्वेंना दिले आहेत.


हा नियम नवीन नाही; २०१४ मध्येच सूचना

रेल्वेच्या डब्यांमधील चार्जिंग पॉइंट रात्री बंद ठेवण्याची सूचना प्रथमच देण्यात आलेली नाही. रेल्वे बोर्डाने १९ जून २०१४ रोजीच यासंदर्भात निर्देश जारी केले होते. यापूर्वी रेल्वेगाडीत लागलेल्या आगीच्या घटनांनंतर सुरक्षेच्या दृष्टीने हा नियम लागू करण्यात आला होता. मार्च २०२१ मध्येही रेल्वेने या नियमाच्या काटेकोर अंमलबजावणीवर भर दिला होता.


मात्र, नियम अस्तित्वात असूनही काही ठिकाणी त्याचे पालन होत नसल्याचे अलीकडील घटनेतून समोर आले, त्यामुळे २६ ऑक्टोबरच्या पत्राद्वारे रेल्वे बोर्डाने सर्व विभागीय रेल्वेंना पुन्हा स्पष्ट सूचना दिल्या आहेत. या वेळेत डब्यांमधील चार्जिंग पॉइंट बंद राहतील, याची खात्री करण्याची जबाबदारी संबंधित कर्मचाऱ्यांवर असेल.


नियम पाळला जातोय की नाही, यासाठी अचानक तपासणी

रेल्वे बोर्डाने संबंधित कर्मचाऱ्यांना या नियमाबाबत स्पष्ट सूचना देण्याबरोबरच आवश्यक प्रशिक्षण आणि मार्गदर्शन देण्याचे निर्देश दिले आहेत. रात्री ११ ते पहाटे ५ या वेळेत चार्जिंग पॉइंट बंद आहेत की नाहीत, याची खातरजमा करण्यासाठी अधिकारी आणि पर्यवेक्षकांनी अचानक तपासणी करावी असेही सांगण्यात आले आहे. नियमाच्या अंमलबजावणीत हलगर्जी आढळल्यास संबंधित कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाऊ शकते. प्रवाशांच्या सुरक्षेशी संबंधित या सूचनांचे पालन करण्याबाबत कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नसल्याचे रेल्वे बोर्डाने स्पष्ट केले आहे.


२६ ऑक्टोबर २०२६ रोजी जारी केलेल्या पत्रात या नियमाबाबत कोणतीही सूट दिली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मुंबई-हावडा मेलमध्ये चार्जिंगला लावलेल्या पॉवर बँकचा स्फोट झाल्यानंतर रेल्वेने पुन्हा एकदा या नियमाच्या अंमलबजावणीवर भर दिला आहे. याबद्दल सविस्तर वृत्त विऑनने दिले आहे.


मुंबई-हावडा मेलमध्ये पावर बँकचा स्फोट

२५ ऑक्टोबरच्या पहाटे ओडिशातील बंडामुंडा स्थानकाजवळ मुंबई-हावडा मेलमध्ये (गाडी क्रमांक १२८०९) ही घटना घडली. गाडीच्या बी-३ एसी डब्यात एका प्रवाशाने पॉवर बँक चार्जिंगला लावली होती. पहाटे सुमारे ३ वाजून ३८ मिनिटांनी पॉवर बँकचा स्फोट झाला, त्यामुळे डब्यात धूर पसरला आणि अग्निसूचक यंत्रणा कार्यान्वित झाली. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीती निर्माण झाली. यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. गाडी सुमारे १५ मिनिटे थांबल्यानंतर पुन्हा रवाना झाली. या घटनेत कोणालाही दुखापत झाल्याचे वृत्त नाही. मात्र, निर्धारित वेळेत चार्जिंग पॉइंट बंद न केल्यामुळे अशा प्रकारच्या दुर्घटनांचा धोका वाढू शकतो, याकडे रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधले गेले.


प्रवाशांनी काय काळजी घ्यावी?

रात्रीच्या रेल्वे प्रवासात मोबाईल किंवा इतर आवश्यक इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरायची असल्यास प्रवाशांनी प्रवास सुरू होण्यापूर्वी ती चार्ज करून घ्यावीत. रात्री ११ नंतर चार्जिंग पॉइंट उपलब्ध असेल, असे गृहीत धरू नये. तसेच, चार्जिंगला लावलेला मोबाईल किंवा पॉवर बँक असामान्यपणे गरम होत असेल, त्यातून धूर येत असेल किंवा जळल्यासारखा वास येत असेल तर त्याचा वापर तातडीने थांबवून रेल्वे कर्मचाऱ्यांना माहिती द्यावी.