Chandrapur Murder : चंद्रपुरात थरारक हत्या! जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर दगडाने ठेचून एकाची हत्या

Bhairav Diwase

चंद्रपूर:-
चंद्रपूर शहरातील मुख्य मार्गावर असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर किरकोळ कारणावरून एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

रंजीत राजवंशी (वय ३५) असे मृत व्यक्तीचे नाव असून, या प्रकरणातील आरोपी अमन कुर्वे (वय २९) याला शहर पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, किरकोळ कारणावरून आरोपीने रंजीत यांच्या डोक्यावर दगडाने सहा ते सात वेळा प्रहार केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या रंजीत यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपीला ताब्यात घेऊन अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास शहर पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे करत आहेत.