Chandrapur police : शहीद पोलिसांना मानाचा मुजरा; शहीद जवानांच्या कुटुंबीयांचे डोळे पाणावले!

Bhairav Diwase
चंद्रपूर:- देशाची सुरक्षा आणि नागरिकांचे रक्षण करताना आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूर पोलीस जवानांना आज संपूर्ण देश अभिवादन करत आहे. २१ ऑक्टोबर हा दिवस पोलीस स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. दरम्यान, १९५९ मध्ये लडाखमधील भारत-चीन सीमेवर हॉट स्प्रिंग्स परिसरात चिनी सैन्याच्या हल्ल्यात शहीद झालेल्या दहा भारतीय पोलिसांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ २१ ऑक्टोबर रोजी पोलीस स्मृतिदिन पाळला जातो.


याच पार्श्वभूमीवर चंद्रपूर येथील पोलीस मुख्यालयाच्या हुतात्मा स्मारक मैदानावर पोलीस स्मृतिदिनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी देशासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्मा पोलीस अधिकारी आणि जवानांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली.


या कार्यक्रमाला चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी श्रीमती वसुमना पंत, चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त अकनुरी नरेश यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, सहायक पोलीस अधीक्षक कुमार सुशांत, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्यासह पोलीस दलातील अधिकारी व व कर्मचारी उपस्थित होते.


यावेळी जिल्ह्यातील शहीद पोलीस जवानांना आदरांजली वाहण्यात आली, तर त्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान करून त्यांच्या त्यागाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. आपल्या कुटुंबातील सदस्य देशाच्या सेवेसाठी शहीद झाल्याच्या आठवणींनी यावेळी अनेक नातेवाईकांचे डोळे पाणावले.