Chandrapur police: कोंबड बाजारावर छापा; ७ आरोपी अटकेत

Bhairav Diwase

चंद्रपूर:-
चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस पोलिसांनी बेकायदेशीर कोंबड बाजारावर धडक कारवाई केली आहे. अंतुर्ला शेतशिवारातील वन विभागाच्या खुल्या जागेत सुरू असलेल्या कोंबड्यांच्या झुंजीवर जुगार खेळणाऱ्या सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईत रोख रकमेसह मोटारसायकली, लढाईचे कोंबडे आणि जुगाराचे साहित्य असा एकूण ३ लाख २४ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती आहे.


घुग्गुस पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या अंतुर्ला शेतशिवार परिसरात रविवारी, २५ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक रविंद्र वाघ आणि त्यांचे पथक परिसरात पेट्रोलिंग करत असताना, वन विभागाच्या खुल्या जागेत कोंबड्यांच्या झुंजीवर पैशांची बाजी लावून जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला. पोलिसांना पाहताच घटनास्थळी पळापळ सुरू झाली. मात्र, पोलिसांनी घेराव घालून सात जणांना ताब्यात घेतले. घटनास्थळावरून चार जिवंत कोंबडे आणि जुगारासाठी वापरण्यात येणारे साहित्यही जप्त करण्यात आले. या कारवाईत जुगाराच्या डावावरील आणि आरोपींच्या अंगझडतीतील ८ हजार २५० रुपये रोख रक्कम, मोटारसायकली, लढाईचे कोंबडे आणि लोखंडी कात्या जप्त करण्यात आल्या. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ३ लाख २४ हजार २५० रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे:
१) निलेश मधुकर बांदूरकर (वय ४० वर्षे, रा. सोनेगांव, ता. जि. चंद्रपूर)
२) शामसुंदर वारलुजी वैद्य (वय ४२ वर्षे, रा. वडगांव, ता. जि. चंद्रपूर)
३) राजा वासुदेव टेकाम (वय ५० वर्षे, रा. सोनेगांव, ता. जि. चंद्रपूर)
४) दिवाकर शामराव जोगी (वय ४५ वर्षे, रा. अंतुर्ला, ता. जि. चंद्रपूर)
५) रविन्द्र कवडुजी मशाखेत्री (वय ४० वर्षे, रा. चांदेरी, ता. जि. चंद्रपूर)
६) राहुल केशव वाढई (वय ३५ वर्षे, रा. ताडाली, ता. जि. चंद्रपूर)
७) केतन छत्रपती ठमके (वय ३१ वर्षे, रा. वाघोबा चौक, तुकुम, ता.जि. चंद्रपूर)

या प्रकरणी घुग्गुस पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक ३१४/२०२६ अन्वये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १२(अ) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास घुग्गुस पोलीस करत आहेत.

पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली, ठाणेदार प्रकाश राऊत यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक रविंद्र वाघ पोहवा संजय अत्कुलावर,अनिल बैठा, राकेश तुराणकर,पोअं महेश भोयर, सचिन वसाडे,पोअं रविन्द्र शेंडे, पोअं तोताराम ठाकरे, सूरज राजुरकर, अल्केश सावंत, आणि पोअं विशाल पुसाम यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.