Chandrapur Police : केव्हीआर कंपनीचा ट्रक पेटवणाऱ्या चौघांच्या मुसक्या आवळल्या

Bhairav Diwase

चंद्रपूर:-
चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घूस परिसरात चालकाला जबरदस्तीने खाली उतरवून केव्हीआर कंपनीचा ट्रक पेटवून देणाऱ्या चार फरार आरोपींना अखेर घुग्घूस पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) चंद्रपूरच्या संयुक्त पथकाने अटक केली आहे. या धडक कारवाईमुळे परिसरातील एका मोठ्या गुन्ह्याचा पर्दाफाश झाला आहे.


गेल्या महिन्यात, म्हणजेच २९ सप्टेंबर २०२६ रोजी रात्रीच्या सुमारास, नकोडा ते बहिरांबाबा मंदिर दरम्यान असलेल्या डंपर रोडवर काही अज्ञात इसमांनी केव्हीआर कंपनीचा ट्रक (क्रमांक MH 34 CQ 3385) अडवला होता. आरोपींनी चालकाला जबरदस्तीने खाली उतरवून ट्रकला आग लावली, ज्यामुळे ट्रॅकचे मोठे नुकसान झाले होते. या प्रकरणी चालकाच्या फिर्यादीवरून घुघूस पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहितेच्या (BNS) संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.


गुन्हा घडल्यापासून सर्व आरोपी फरार होते. मात्र, पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांच्या आदेशानुसार आणि पोलीस निरीक्षक प्रकाश राऊत यांच्या मार्गदर्शनात घुघूस पोलीस व एलसीबीच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे कसून शोध घेतला. या संयुक्त पथकाने दिनांक ९ आणि १० ऑक्टोबर २०२६ रोजी धडक कारवाई करत समशेर मेहबूब शेख, खुर्शीद इकराम खान, आफताब नफिस अहेमद आणि इरफान रफिक शेख या चारही मुख्य आरोपींना अटक केली आहे.


हि कारवाई आयुष नोपानी पोलीस अधिक्षक चंद्रपुर, अप्पर पोलीस अधिक्षक ईश्वर कातकडे, यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपुर प्रमोद चौगुले, यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक प्रकाश राऊत, पीएसआय रवींद्र वाघ, पोलीस हवालदार अनिल बैठा, राकेश तुराणकर, विशाल हूड, महेश भोयर, प्रसन्ना डोरलीकर, पवन डाखरे, रवींद्र शेंडे आणि तोताराम ठाकरे यांनी सहभाग घेतला. आरोपींविरुद्ध पुढील कायदेशीर तपास घुग्घूस पोलीस करीत आहेत.