Chandrapur Tiger Attack : चंद्रपूर जिल्ह्यात वाघांचा धुमाकूळ! एकाच दिवशी दोन जणांचा मृत्यू, गुराखी गंभीर जखमी

Bhairav Diwase

चंद्रपूर:-
चंद्रपूर जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष दिवसेंदिवस गंभीर होत असून, वाघांच्या हल्ल्यांच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ३० ऑक्टोबर रोजी जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्याच्या तीन घटना समोर आल्या आहेत. यामध्ये दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, एक गुराखी गंभीर जखमी झाला आहे. पोंभुर्णा, चिमूर आणि सिंदेवाही तालुक्यांत घडलेल्या या घटनांमुळे वनविभागाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

पोंभुर्णा तालुक्यातील सातारा तुकूम परिसरात गायी चारण्यासाठी जंगलात गेलेल्या राजेश्वर बिजा सिडाम (वय ६०) यांच्यावर वाघाने हल्ला केला. सातारा तुकूम येथील वनकक्ष क्रमांक ४३६ मध्ये दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक झडप घातली. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले.

घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी आणि गोंडवाना आंदोलन आदिवासी चळवळीचे पदाधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमी सिडाम यांना तातडीने चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दुसरी घटना चिमूर वनपरिक्षेत्रातील गदगाव नियतक्षेत्रात घडली. गरडापार येथील सदाशिव चिरकटा खडसंग (वय ५५) हे आपल्या शेताला लागून असलेल्या जंगल परिसरात गेले असताना दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. ३० ऑक्टोबर रोजी दुपारी सुमारे १.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. ही घटना ब्रह्मपुरी वनविभागांतर्गत येणाऱ्या परिसरात घडली असून, घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहेm.

तिसरी घटना सिंदेवाही तालुक्यातील धुमनखेडा येथे घडली. पत्रुजी मेश्राम (वय ७०) हे शेतात काम करत असताना अचानक दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. विशेष म्हणजे, या परिसरात अवघ्या १५ दिवसांत वाघाच्या हल्ल्याची ही तिसरी घटना असल्याचे सांगण्यात येत आहे.


वनविभागाच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह!

एकाच दिवशी चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्याच्या तीन घटना घडून दोन नागरिकांना जीव गमवावा लागला, तर एकाला गंभीर दुखापत झाली आहे. शेतात काम करणारे शेतकरी, गुरे चारण्यासाठी जंगलात जाणारे गुराखी आणि ग्रामीण भागातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.


वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, वनविभागाने तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, वाघांच्या हालचालींवर लक्ष ठेवावे आणि नागरिकांच्या जीविताचे संरक्षण करावे, अशी मागणी होत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात वाढत्या वाघांच्या हल्ल्यांना आळा कधी बसणार? नागरिकांना सुरक्षिततेची हमी कधी मिळणार? हा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.