Gadchiroli-bridge-construction : जवान आणि ग्रामस्थांनी श्रमदानातून उभारला ६० मीटरचा पूल

Bhairav Diwase

गडचिरोली:-
पावसाळ्यात पुराच्या पाण्यामुळे संपर्क तुटणार्‍या बिनागुंडा ग्रामस्थांसाठी जवान व ग्रामस्थांनी एकत्र येत श्रमदानातून तब्बल 60 मीटर लांबीच्या पुलाची उभारणी केली आहे. या उपक्रमामुळे बिनागुंडा ते लाहेरी मार्गावरील वाहतुकीचा प्रश्‍न मार्गी लागला असून परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. बिनागुंडा गावाजवळील नाल्याला पाणी आल्याने ग्रामस्थांची ये-जा बंद होत असे. परिणामी, ऐनवेळी रुग्णांना वैद्यकीय मदत मिळणे कठीण होत होते, तर विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत होते.

या गंभीर समस्येची दखल घेत गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली 22 ऑक्टोबर रोजी पोलिस मदत केंद्र बिनागुंडाचे पथक ग्रामभेटीसाठी गेले होते. या दरम्यान सुरक्षेचा योग्य बंदोबस्त ठेवून, पोलिस अधिकारी, अंमलदार, सीआरपीएफ, एसआरपीएफ आणि सी-60 जवानांनी स्थानिक ग्रामस्थांच्या साथीने प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. यासाठी पोलिसांना स्थानिकांनीही सहकार्याची भूमिका घेतली. त्यामुळे पुलाचे काम वेगाने पूर्ण झाले.

एक ट्रॅक्टर, एक जेसीबी आणि 8 सिमेंट पाईपचा वापर करून अत्यंत कष्टाने तब्बल 60 मीटर लांबीचा पूल श्रमदानातून उभारण्यात आला. यापूर्वी 13 सप्टेंबर रोजी नेलगुंडा येथेही अशाच प्रकारे पोलिसांच्या पुढाकाराने पूल उभारण्यात आला होता. या संकटसमयी मदतीला धावून आलेल्या पोलिसांच्या या सामाजिक उपक्रमामुळे बिनागुंडा व परिसरातील नागरिकांमध्ये गडचिरोली पोलिसांबद्दल विश्‍वासाची व आपुलकीची भावना निर्माण झाली आहे.

प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक तुकाराम नलवडे, उपनिरीक्षक शिरसाट, यलगंदकर, एसआरपीएफचे उपनिरीक्षक ए. आर. चांगण, सी-60 चे उपनिरीक्षक मनोहर पटले यांच्यासह जवानांनी मोलाचे योगदान दिले.