Two Brothers Death : सौर झटका मशिनच्या धक्क्याने दोन सख्ख्या भावांचा मृत्यू

Bhairav Diwase

गडचिरोली:-
वन्यप्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतात लावलेल्या सौर झटका मशिनचा धक्का बसल्याने दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला. देसाईगंज तालुक्यातील चिखली येथे शुक्रवारी (ता.९) दुपारी २ वाजता ही घटना उघडकीस आली. अरविंद धर्माजी बुद्धे (वय ५०) व अशोक धर्माजी बुद्धे (वय ५८) अशी मृत भावंडांची नावे आहेत.


बुद्धे परिवाराची गावापासून काही अंतरावर जंगलालगत शेती आहे. शुक्रवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास अरविंद बुद्धे हे शेतात कीटकनाशक फवारण्यासाठी गेले. परंतु दुपार होऊनही ते घरी न परतल्याने मोठे भाऊ अशोक बुद्धे शेतावर गेले. तेव्हा अरविंद हे सौर झटका मशिनच्या तारेच्या कुंपणाजवळ मृतावस्थेत आढळले. अशोक यांनी अरविंदला स्पर्श करताच जोरदार धक्का बसल्याने तेही मृत्यूमुखी पडले.


बराच वेळ होऊनही दोन्ही भाऊ घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शेतावर जाऊन बघितले असता दोघेही मृतावस्थेत आढळले. घटनेच्या वेळी गावात मस्कऱ्या गणपतीच्या विसर्जनाची तयारी सुरु होती. मात्र, दोन भावांचा मृत्यू झाल्याची वार्ता समजताच चिखली गावावर शोककळा पसरली. घटनेनंतर देसाईगंजचे पोलिस निरीक्षक स्वप्नील इज्जपवार यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पुढील तपास पोलीस करीत आहे.