चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील तळोधी-बाळापूर येथे बीएड परीक्षेदरम्यान कथित कॉपीचा गंभीर प्रकार समोर आला आहे. एका संस्थाचालकाच्या मुलाने आपल्याच संस्थेच्या महाविद्यालयात असलेल्या परीक्षा केंद्रावर कॉपी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली असून, या संदर्भातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुरावे गोंडवाना विद्यापीठाकडे सादर करण्यात आले आहेत. विद्यापीठाकडून आता या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
यश उन्मेष गेडाम असे संबंधित विद्यार्थ्याचे नाव असल्याचे समोर आले आहे. यावर्षी एप्रिल आणि मे महिन्यात झालेल्या बीएड परीक्षेदरम्यान हा कथित प्रकार घडल्याचा आरोप आहे. उन्मेष गेडाम यांचे तळोधी-बाळापूर येथे श्रीकृष्ण बीएड महाविद्यालय आहे. याच महाविद्यालयात यश गेडाम हा बीएडचे शिक्षण घेत आहे. विशेष म्हणजे, गेडाम यांचेच गोविंद प्रभू कला व वाणिज्य महाविद्यालय देखील तळोधी-बाळापूर येथे आहे.
श्रीकृष्ण बीएड महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी बीएड परीक्षेचे केंद्र म्हणून गोविंद प्रभू कला व वाणिज्य महाविद्यालय निश्चित करण्यात आले होते. मात्र, याच परीक्षा केंद्रावर यश गेडाम याने महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने पेपर सोडवल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. या कथित गैरप्रकाराचे सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुरावे तक्रारदाराकडून गोंडवाना विद्यापीठाला सादर करण्यात आले आहेत.
आता या प्रकरणात विद्यापीठाच्या चौकशीतून नेमके काय निष्पन्न होते, संबंधित विद्यार्थ्याची आणि महाविद्यालयाची भूमिका काय असते, तसेच दोषींवर कोणती कारवाई केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


