Top News

होते 'परमेश्वर' म्हणून.., 40 फूट खोल विहिरीत उडी घेऊन वाचवला बापलेकीचा जीव.

वेळेवर धावून आला 'परमेश्‍वर'..., म्हणून वाचला बापलेकीचा जीव.
   Bhairav Diwase.    May 31, 2020
(आधार न्यूज नेटवर्क मुख्य संपादक)भैरव दिवसे, जिल्हा चंद्रपूर
चिमुर:- महाराष्ट्रापुढे कोरोनाचे संकट उभे ठाकले आहे. पोलीस कर्मचारी आपल्या जीवाची बाजी लावून कर्तृव्य बजावत आहे. चंद्रपूरमध्ये कर्तृव्यावर असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने 40 फूट खोल विहिरीत उडी घेऊन बाप-लेकीचे प्राण वाचवले आहे. त्यांच्या कार्याचं शहरात कौतुक होत आहे.

चिमुर तालुक्यातील शंकरपूर येथे ही घटना घडली आहे. प्रभाकर (वय 27) आणि त्यांची अडीच वर्षांची मुलगी शिवन्या हे दोघे घरासमोर खेळत होते. घरासमोर खेळत असताना अचानक तोल जाऊन विहिरीत पडले. बाप-लेक विहिरीत पडल्यामुळे एकच खळबळ उडाली. गावातील लोकांनी दोघांना वाचवण्यासाठी धावाधाव केली. त्याचवेळी गावात परमेश्वर नागरगोजे हे पोलीस कर्मचारी पेट्रोलिंगवर आले होते. गावातील लोकांनी विहिरीत बापलेक पडल्याची माहिती दिली. त्यानंतर परमेश्वर हे तातडीने घटनास्थळी पोहोचले. विहिरीजवळ पोहोचल्यावर बापलेक हे मदतीसाठी याचना करत होते. परमेश्वर यांनी क्षणाचाही विलंब न करता थेट 40 फूट खोल विहिरीत उडी मारली. तोपर्यंत विहिरीजवळ गावकऱ्यांची मोठी गर्दी झाली होती. काही वेळात परमेश्वर यांनी दोघांनाही सुखरूप विहिरीतून बाहेर काढले. 
       बापलेकीला शंकरपूर येथील आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. उपचारादरम्यान दोघांच्याही प्रकृतीत सुधारणा झाली आहे. थोडाही उशीर झाला असता तर मोठी दुर्घटना घडली असती. मात्र, परमेश्‍वर यांच्या धाडसाने दोघांचा जीव वाचला. हा थरार गावकऱ्यांनी अनुभवला. सगळ्यांनी पोलिस शिपाई परमेश्‍वर नागरगोजे यांचे आभार मानले. नावच नाही, तर तुम्ही आमच्यासाठी साक्षात परमेश्‍वर आहात, अशी भावना चिमुकलीच्या वडिलाची होती. विहिरीतून बाहेर काढल्यानंतर प्रभाकर आणि त्यांच्या मुलीला तातडीने शंकरपूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केलं. आता दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. घटनेचं गांभीर्य ओळखून परमेश्वर नागरगोजे यांनी दाखवलेल्या धाडसामुळे बापलेकीचा जीव वाचला. त्यांच्या या धाडसी कार्याचं पोलीस दलासह संपूर्ण परिसरात कौतुक केलं जात आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने