🔴 वनपरिक्षेत्रातील मजूरांना ‘तेंदूपत्ता संकलन’ मोठी पर्वणी असून वरदान ठरत आहे
Bhairav Diwase. May 15, 2020
चंद्रपूर:- सध्या कोरोनाच्या महामारीत देश लॉकडाऊन असल्याने मजूरांचे मजूरी करण्याचे चाके थांबली होती. परंतु बल्लारशाह वनविभागाने तेंदूपत्ता संकलन सुरु केल्याने वनपरिक्षेत्रातील मजूरांना ‘तेंदूपत्ता संकलन’ मोठी पर्वणी असून वरदान ठरत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथीचा रोग प्रतिबंधक कायदा 1897 दिनांक 13.02.2020 पासून लागू करुन खंड 2, 3 व 4 तरतुदी नूसार अधिसूचना निर्गमित केलेली असून त्याची नियमावली तयार करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांनी वेळोवेळी दिलेल्या अटीशर्ती व आदेशानुसार सर्व तेंदूपत्ता संकलन मजूरांनी नियमांचे पालन करुन आपली मजूरी मिळवावी परंतु कायद्याचे कोणतेही उल्लंघन करु नये. आपण स्वतः सुरक्षित राहून आपल्या कुटुंबाला, आपल्या गावाला, आपल्या देशाला सुरक्षित ठेवण्यास मदत करण्यासाठी खालील नियमांचे काटेकोर पालन करावे असे बल्लारशाह वनविभागाने सुचवले आहे.
केंद्र व महाराष्ट्र शासन यांच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, आरोग्य विभाग व वनविभाग यानी वेळोवेळी दिलेल्या आदेशाचे पालन करावे, दर 20 मिनिटाला आपले हातपाय साबनाने किंवा जंतूनाशकाने स्वच्छ धुवावे, शिंकतांना किंवा खोकतांना तोंडावर रुमाल, मास्क किंवा स्वच्छ कापडाचा वापर करावा, दोन व्यक्ती मध्ये कमीतकमी 2 मिटर अंतर ठेवावे, तेंदूपत्ता फळीवर उभे राहतांना किंवा बसतांना सुरक्षित अंतर ठेवावे व गर्दी करु नये, जंगलात किंवा फळीवर जातांना व इतर ठिकाणी फिरतांना नेहमी तोंडाला रुमाल, मास्क बांधूनच जावे, एकमेकांसोबत हस्तांदोलन करु नये, वारवांर तोंडाला व नाकाला हात लावू नये, सार्वजनिक ठिकाणी व खुल्या जागेवर थुंकू नये, फळीवर आल्यावर व फळीवरुन घरी गेल्यावर साबनाने किंवा जंतनाशकाने हात स्वच्छ धुवावे, आजारी व्यक्ती किंवा आजारा बाबतची माहिती गावातील सरपंच, पोलीस पाटील यांना त्वरित द्यावी, तेंदूपाने गोळा करण्यास सुर्योदयानंतर जंगलात समूहाने जावे एकटे जावू नये, जंगल हे जगलात राहणाऱ्या प्राण्यांचे घर असल्याने त्यांचे वास्तव्य असलेल्या भागात एकटे जावू नये व वनविभागाने वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन करण्याच्या सुचना बल्लारशाह वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिफे यांनी केलेल्या आहेत.
वरील सर्व नियमांचे काटेकोर पालन करीत वनपरिक्षेत्रातील कळमना, बामनी, दहेली, केम, कोर्टी, लावारी, कवडजई, उमरी पोतदार, सातारा भोसले, सातारा कोमटी इत्यादी गावात तेंदूपाने संकलन केले करण्यात आले असून प्रति शेकडा 220 रुपये मंजूर असल्याने गावकरी स्वखुशीने तेंदूपाने संकलन करीत आहेत. व बल्लारशाह वनपरिक्षेत्र विभागाकडून तेंदूपत्ता संकलन सुरू केल्याने आता ही काम मजूरांसाठी वरदान ठरत आहे.