Click Here...👇👇👇

अवैध वाळू उत्खननावर नियंत्रण आणण्यासाठी संयुक्त पथकामार्फत कारवाई करा:- गृहमंत्री

Bhairav Diwase
नागपूर विभागातील अधिकाऱ्यांच्या बैठकीत ना. अनिल देशमुख यांचे निर्देश
Bhairav Diwase.   June 16, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) वैभव एनपल्लीवार, चंद्रपर
चंद्रपूर:- नागपूर विभागातील अवैध वाळू उत्खननाबाबत वाढत्या तक्रारीवर नियंत्रण आणण्यासाठी महसूल, पोलीस व परिवहन विभागामार्फत संयुक्तरीत्या कारवाई करण्यात यावी. यासाठी पथकांची निर्मिती करण्यात यावी, असे निर्देश राज्याचे गृह मंत्री अनिल देशमुख यांनी आज येथे दिले.

     नागपूर विभागातील वाळू वितरणाच्या संदर्भात वेगवेगळ्या जिल्ह्यातून विविध तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. काही ठिकाणी गंभीर स्वरूपाचे गुन्हे देखील दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर नागपूर विभागातील नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा या चार जिल्ह्यातील वाळू वितरणाच्या बाबत आढावा घेण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही बैठक आयोजित केली होती. या बैठकीत राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार, राज्याचे ऊर्जा मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितीन राऊत तसेच आमदार आशिष जैस्वाल सहभागी झाले होते. चंद्रपूर येथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, उपजिल्हाधिकारी पुनर्वसन जे. पी.लोंढे, जिल्हा खनिज अधिकारी गजानन कामडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी एस.पी. फासे, उपविभागीय अधिकारी मनोहर गव्हाड चंद्रपूर, क्रांती डोंबे ब्रम्हपुरी, प्रकाश संकपाळ चिमूर, सुभाष शिंदे वरोरा, संजयकुमार ढवळे बल्लारपूर, महादेव खेडकर मूल यांचा समावेश होता.


जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी यावेळी जिल्ह्यातील उपलब्ध असणारे वाळू बेट व यासंदर्भात घेतलेली सार्वजनिक सुनावणी, मान्यतेसाठी पाठविण्यात आलेला प्रस्ताव, ग्राम दक्षता समितीचे गठण, भरारी पथकाची निर्मिती, चाळीस घाटांवर सीसीटीव्ही लावण्याचा प्रस्ताव, शस्त्रधारी पोलिसांची नियुक्ती, ड्रोन कॅमेराद्वारे पहाणी आणि जिल्ह्यात आतापर्यंत दाखल करण्यात आलेले गुन्हे, याबाबतची गेल्या दोन वर्षाची माहिती या बैठकीत सादर केली.


चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी यावेळी या बैठकीमध्ये भंडारा, नागपूर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाळूचे ट्रक अवैधरित्या उभे असल्याचे आढळून आल्याचे सांगितले. त्यांनी यावेळी गौण खनिजाचे अवैध उत्खनन व वहन अवैधरित्या होत असल्याचे लक्षात आणून देत नाकाबंदी वाढविण्याची सूचना केली.तसेच टोल नाक्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे, अशी सूचना केली. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी देखील भंडारा जिल्ह्यातील उत्खननाबाबत आक्षेप नोंदविला.


शेवटी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रेती आणि गौण खनिज सुलभरीत्या उपलब्ध होण्यासाठी आवश्यक असणारी कारवाई प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी समन्वय ठेवून करावी, असे निर्देश दिले. तसेच अवैधरीत्या रेती उत्खनन करणार्‍यांवर कडक कारवाई करण्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले. प्रचलित कायद्यानुसार दंड वसुलीची कार्यवाही करावी, वारंवार ज्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे अशांची मक्तेदारी मोडण्यासाठी प्रयत्न करण्याचेही त्यांनी स्पष्ट केले.