🔴बांधकामाचे बाजूने नविन पाईपलाईन बनवून पाणीपुरवठा सुरू करावा अशी जनतेची मागणी.
🔴कसरगट्टा, बोर्डा दिक्षित, आंबेधानोरा, चेकहत्तीबोडी, डोंगरहळदी तुकूम, हेटी, सातारा कोमठी व गोपाळनगरी येथील नागरिकांची पाण्यासाठी वणवण.
Bhairav Diwase. June 21, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- युती शासनाच्या काळात डोंगरहळदी व आसपासच्या दहा गावातील पाणी समस्या दूर करण्यासाठी या योजनेची अंमलबजावणी केली. काही वर्ष ही योजना सुरळीत सुरू होती. मात्र मागील पंचवार्षिक मध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेवर आले आणि तालुक्यात विकासाची गंगा वाहू लागली. रस्ते दुरूस्ती करतांना या योजनेची पाईपलाईन फुटून डोंगरहळदी व परिसरातील गावात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. वारंवार होणारा सदोष पाणीपुरवठा अनेकांना भ्रमित करणारा ठरला आहे. चारपाच दिवस झाले तर आजतरी पाणीपुरवठा सुरू होईल व पाण्यासाठी होणारी भटकंती थांबेल, पण हा केवळ दुर्दम्य आशावाद ठरू पाहतो आहे. मागील १५ दिवसापासून या परिसरात होणारा पाणीपुरवठा ठप्प असून ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे जनतेला साधे पिण्याचे पाणी मिळणे सुद्धा दुरापास्त झाले आहे.
पोंभूर्णा येथील जलशुद्धीकरण केंद्राजवळ पाईपलाईन लीकेज झाल्याने खोदकाम करून दुरुस्ती करण्यात आली. परंतु पाईप सुरळीत होत असतांनाच पुन्हा लीकेज झाल्याने मागील आठवडाभरापासून दुरूस्ती करण्यात येत असल्याचे या योजनेचे कंत्राटदार सांगत आहेत. राजराजेश्वर मंदिर परिसरात नव्याने बांधकाम होत असल्याने ही लाईन दुरूस्ती करण्यात अडचण निर्माण होत असून, या बांधकामाचे बाजूने नविन पाईपलाईन बनवून पाणीपुरवठा सुरू करावा अशी जनतेची मागणी आहे. कसरगट्टा, बोर्डा दिक्षित, आंबेधानोरा, चेकहत्तीबोडी, डोंगरहळदी तुकूम, हेटी, सातारा कोमठी व गोपालनगरी येथील नागरिकांची पाण्यासाठी वणवण होत असून ग्रामीण पाणीपुरवठा विभाग याकडे लक्ष देईल काय असा सवालही आता उपस्थित होत आहे.