अद्याप बेपत्ता : वर्धा नदीत मोटरसायकल सह युवक पडला.

Bhairav Diwase
Bhairav Diwase.    Aug 04, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- दिनांक ३ ऑगस्टला दुपारी सव्वा तिन वाजता राजुरा येथून बामणीकडे जातांना वर्धा नदीच्या पुलाजवळील खड्डे चुकवितांना तोल गेल्याने एक मोटरसायकल स्वार आपल्या दुचाकी गाडीसह नदीत पडला. यावेळी रस्त्यावरुन जाणाऱ्यांनी आरडाओरडा करुन मदतीचा प्रयत्न केला. परंतू यावेळी काहीच शक्य न झाल्याने हा इसम नदीत वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली.


घटनेची माहिती मिळताच राजुरा पोलिसांनी घटनास्थळी येऊन शोध घेतला मात्र, या अज्ञात व्यक्तीचा अद्याप शोध लागलेला नाही.



मिळालेल्या माहितीनुसार हा व्यक्ती आपल्या दिशेने येतांना पुलाच्या सुरुवातीला असलेले खड्डे चुकवितांना एकाएकी पुलावरुन मोटरसायकल सह नदीत कोसळला. यावेळी रस्त्यावरुन जाणाऱ्या लोकांनी आरडाओरडा करुन मदतीचा प्रयत्न केला. पण आज येथे मच्छीमार नसल्याने कुणीही मदत करु शकले नाही. हा इसम पुलाखालील पाण्यातील दुसऱ्या बाजुला आला. तेथे तिन-चार गटांगळ्या खाल्ल्यानंतर तो नदीच्या प्रवाहात वाहून गेला. बेपत्ता इसमाचा शोध व या घटनेचा तपास ठाणेदार नरेंद्र कोसूरकर करीत आहेत.