Top News

खासदार अशोक नेते यांचा पूरग्रस्त भागात दौरा.

सावली व ब्रम्हपुरी तालुक्यातील पुरपीडित भागाची केली पाहणी.

नुकसानग्रस्त भागाचे  तात्काळ सर्व्हेक्षण करण्याचे निर्देश.
Bhairav Diwase.    Aug 31, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी आज दि 31 आगस्ट रोजी सावली व ब्रम्हपुरी तालुक्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा करून पाहणी केली असता गोसेखुर्द धरणाच्या पाण्यामुळे वैनगंगा नदीसह इतर उपनद्यांच्या पुरामुळे सावली व ब्रम्हपुरी तालुक्यात 52 किलोमीटर पर्यन्तच्या गावामध्ये पुराचे पाणी गेलेले असून घराचे व शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे तसेच सावली तालुक्यातही निमगाव, कसरगाव, डोंगरगाव, विहिरगाव, चिखली, निफन्द्रा, बोरमाळा व अंतरगाव यासह अन्य गावे पाण्याखाली असून गावांचा संपर्क तुटलेला आहे . येथील शेती पूर्णतः पाण्याखाली बुडालेली आहे तसेच शाळा,महाविद्यालय, आरोग्य केंद्र व अन्य कार्यालये पाण्याने वेढलेली आहेत.
         
गंभीर पूर परिस्थिती पाहता खासदार अशोक नेते यांनी लागलीच चंद्रपूरचे जिल्हाधिकारी श्री अजय गुल्हाने व सावलीचे तहसीलदार पाटील यांना भ्रमणध्वनी वर संपर्क करून पुराची परिस्थिती पाहता युद्धपातळीवर काम करून परीसरातील सर्व शेतीचे व इतर नुकसानीचे सर्व्हेक्षण करून तसा अहवाल शासनाकडे पाठविण्याचे निर्देश दिले. तसेच 1994 नंतरचा सर्वात मोठा पूर आलेला असल्याने संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेळीच दखल घेऊन नागरिकांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे सूचनाही यावेळी खासदार अशोक नेते यांनी केल्या.
      तसेच ब्रम्हपुरी तालुक्यातील अनेक गावे पाण्याखाली असून गावांचा तालुका व जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटलेला आहे व अनेक गावामधील शेती पाण्याखाली असून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. याची दखल घेत खासदार अशोक नेते यांनी गोसेखुर्द प्रकल्पाचे मुख्य अभियंता यांच्याशी चर्चा करून गोसेखुर्द धरणाचे दरवाजे बंद करण्यात यावे व दरवाजे उघडायाचे झाल्यास कमी प्रमाणात उघडण्याचे निर्देश दिले असता मुख्य अभियंता यांनी पूर्ण 33 दरवाजे आज दि 31 आगस्ट रोजी दुपार पासून बंद करण्यात आले असल्याचे सांगितले.*
   खासदार अशोक नेते यांच्या पूरग्रस्त भागाच्या दौऱ्या दरम्यान भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ भारत खटी, सावलीचे तालुकाध्यक्ष अविनाश पाल, तहसीलदार पाटील, पोलीस निरीक्षक, मंडळ अधिकारी, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने