पालकमंत्री विजय वडेट्टीवारची असंवेदनशिलता?

पालकमंत्री विजय वडेट्टीवारची असंवेदनशिलता?
Bhairav Diwase. Aug 09,2020
चंद्रपूर:- मागील पंधरवाड्यात सावली तालुका अबोल बालीकेंवर झालेल्या लैंगीक अत्याचाराने सुन्न झाला. अशा घटना दिल्ली-मुंबईत उच्चभ्रू समाजातील व्यक्तींच्या बाबतीत घडले तर, देशात निषेधाची आणि मोणबत्तीची लाट उसळते. चंद्रपूर जिल्हयासारख्या मुख्यप्रवाहापासून दुर्लक्षीत असलेल्या, त्यातही सावली सारख्या ग्रामिण वळणाच्या तालुक्यात एका आठवड्यात तीन बालीकेंवर अत्याचार होवूनही समानमन पेटला नाही किंवा, तालुक्याच्या बाहेर ही घटना चर्चेलाही आली नाही. एवढी उदासिनता आपल्या लेकीच्या वाट्याला का यावी?ज्यांचेवर अत्याचार झाला, त्या दलित समाजातील, दोन-अडिच वर्षाची, एक मतीमंद आणि तिसरी दलित समाजातीलच शिक्षण घेत असलेली विद्यार्थीनी आहे. पोलिसांनी आवश्यक ती कारवाई करीत, आपली तांत्रिक जबाबदारी पूर्ण केली मात्र ज्या समाजाने या पिडीतांच्या पालकांच्या बाजूने धैर्याने उभे रहायला पाहीजे होते, ते का राहीले नाही? हा प्रश्न आहे. लॉकडाऊनच्या काळात, निषेधाच्या मिरवणूका काढता येत नाही, समुहाने मेनबत्याही पेटविता येणार नाही, मात्र घटना उघड झाल्यानंतर यावर समाजात आग धुमसली नाही, हे मात्र चिंताजनक आहे.

समाजाने नाही पण, शासन प्रशासनाला तरी, या घटनेचे गांभीर्य आहे काय? या प्रश्नाचे उत्तर नाही असेच आहे.

पाथरीची घटना उघडकीस येताच, हा अत्याचार पब्लिक पंचनामाने आणि सर्व न्युज पोर्टलने प्रसारीत केली. चाईल्ड केअरसह अनेकांनी संपादकांना फोन वरून, तपशिल विचारला, मात्र त्यातील एकानेही या पिडीत कुटूंबियांची भेट घेवून, वस्तुस्थिती जाणून घेतली नाही, किंवा पिडीतेचे ओळख गुपीत ठेवून, त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला नाही, किंवा त्यांना धीर दिला नाही.तालुका प्रशासनातले, पोलिस वगळता (ते त्यांचे कर्तव्य असल्यांने) तहसिलदार किंवा संवर्ग विकास अधिकारी, समाज कल्याणचे अधिकारी यापैकी कुणीही भेटण्यांचे सौजन्य दाखविले नाही. दलित, दुर्बल, शोषितांचे सरंक्षण करण्यांची या अधिकाऱ्यांची जबाबदारी. मात्र त्यांचे सरंक्षणात असलेल्यांवर अत्याचार झाल्यानंतर, त्यांची साधी भेटही न घेण्याची प्रवृत्ती म्हणजे, राज्य घटनेने त्यांना दिलेले कर्तव्य पार पाडण्यात केलेली कुचराईच नाही काय?

ही घटना, सावली तालुक्यात घडली. सावली तालुका हा राज्याचे मदत आणि पुर्नवसन तसेच जिल्हयाचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे मतदार क्षेत्र आहे. म्हणजे पिडीत बालीकांचे, पालकमंत्री हे पालक आहेत. अत्याचार झाल्यानंतर, आठ दिवस ते चंद्रपूर जिल्हयात, सावली तालुक्यात फिरत होते, मात्र ते या पिडीतांची भेट घेतले नाही. आपल्या कार्यकर्त्यांची बैठक घेवून आपले पक्षीय कर्तव्य पार पाडले, मात्र आपल्याच मतदार संघातील पिडीतांना धैर्य देण्यांचे, त्यांचे मनोबल वाढविण्यांची जबाबदारी मात्र ते विसरले! खरं म्हणजे, पालकमंत्री विजय वडेट्टीवार, हे राज्यांचे मदत आणि पुर्नवसन मंत्री आहेत. पिडीतांचे पुर्नवसनासाठी तत्कालीन युपिएच्या नेत्या, सोनिया गांधी यांचे मागणीवरून, मनोधैर्य योजना सुरू करण्यात आली, त्याच पक्षाचे पाईक असलेले मंत्री वडेट्टीवार यांचे क्षेत्रातील पिडीतांना मनोधैर्यचा लाभ अद्यापही देवू शकले नाही. मानसिक धैर्य तर दिले नाहीच, पण शासकीय मदत मिळण्यांचा वेगही वाढविला नाही।

पालकमंत्री विजय वडेट्टीवार हे मतदार संघातील महिलांना आपली बहिण मानतात, त्याच भावनेतून, त्यांनी आपल्या बहिणीला 'साड्याही' वाटल्या होत्या. आशा वर्करचा सत्कार करतांनाही त्यांनी भावा-बहिणीच्या नात्यांला उजाळा दिला होता. मात्र राखी सारख्या पवित्र सणाचे कालावधीत तीन अबोध बालीकेंवरील अत्याचार होत असतांना, आणि भाऊ राज्यांचा मोठा मंत्री असतांना, बहिणीला धीर, मदत, आश्वस्त, सरंक्षण का करीत नाही? हा अस्वस्थ करणारा प्रश्न आहे.राजूरा तालुक्यातील आदिवासी वस्तीगृहातील कोवळया मुलींवर झालेल्या लैंगीक अत्याचाराचे प्रकरणात, श्री. विजय वडेट्टीवार यांनी, 'पैशासाठी आदिवासी मुली अशा खोट्या तक्रारी दाखल करतात,' असे वादग्रस्त विधान केले होते. यावरून, त्यावेळी प्रचंड वादळ निर्माण झाले. श्री. विजय वडेट्टीवार यांचे निषेधात आंदोलनही झाले. आदिवासी कार्यकर्त्याच्या तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी या प्रकरणात सुभाष धोटे व इतर तीन (ते इतर तीन कोण हे पोलिसांनी अजूनही शोधले नाही हा भाग वेगळा) यांचेवर अत्याचार प्रतिबंधक कायदयाप्रमाणे गुन्हाही दाखल केला होता. चूक लक्षात येताच, श्री. विजय वडेट्टीवार यांनी दुसरे दिवशी पत्रकार परिषद घेत, आदिवासी समाजाची माफीही मागीतली होती. मात्र या प्रकरणात श्री. विजय वडेट्टीवार यांची वैचारीक मानसिकता समाजासमोर आली होती, याच मानसिकतेतून तर, पालकमंत्री विजय वडेट्टीवार हे, सावली तालुक्यातील तीन बालीकेच्या अत्याचाराकडे बघत नसावेत ना? तसे असेल तर ही बाब अतिशय गंभीर आहे. तसे नसेल तर, त्यांनी आपल्याच मतदार संघातील लेकीच्या अत्याचाराबद्दल ब्र देखिल का काढला नाही? या प्रश्नाचे उत्तर त्यांना द्यावेच लागेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत