Top News

रूग्‍णालयातील कंत्राटी कर्मचा-यांचे थकीत वेतन त्‍वरीत प्रदान करावे:- डॉ. मंगेश गुलवाडे

भाजपाच्‍या शिष्‍टमंडळाची अधिष्‍ठाता यांच्‍याकडे मागणी.

दोन दिवसात दोन महिन्‍यांचे थकीत वेतन व या महिन्‍यात उर्वरित थकित वेतन देण्‍याचे आश्‍वासन.
Bhairav Diwase. Aug 09, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्‍हा सामान्‍य रूग्‍णालय तसेच शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्‍णालय चंद्रपूर येथे कार्यरत कंत्राटी कर्मचा-यांना नियमित वेतन मिळावे या प्रमुख मागणीसह अन्‍य मागण्‍यांसाठी भाजपाचे महानगर जिल्‍हाध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्‍या नेतृत्‍वात एका शिष्‍टमंडळाने डॉ. सुरपाम प्रभारी अधिष्‍ठाता यांची भेट घेत त्‍यांना निवेदन सादर केले.

चंद्रपूर जिल्‍हा सामान्‍य रूग्‍णालय तसेच शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्‍णालय येथे जवळपास 501 कंत्राटी कामगार गेल्‍या 8 ते 9 वर्षापासून कार्यरत आहे. परंतु सदर कर्मचा-यांचे मासिक वेतन नियमित होत नसून त्‍यांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन मिळत नाही तसेच त्‍यांची पी.एफ. ची रक्‍कम सुध्‍दा त्‍यांच्‍या वेतनातुन कपात होत नाही. बहुतांश कामगार गरीब व मध्‍यमवर्गीय असून वेतनाअभावी त्‍यांच्‍यावर उपासमारीची पाळी आली आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे. यासंदर्भात वेळोवेळी रूग्‍णालय प्रशासनाला अवगत करूनही याकडे दुर्लक्ष होत असल्‍याची बाब चर्चेदरम्‍यान डॉ. मंगेश गुलवाडे यांनी निदर्शनास आणली. येत्‍या दोन दिवसात दोन महिन्‍यांचे थकित वेतन प्रदान करण्‍यात येईल व याच महिन्‍यात उर्वरित तीन महिन्‍यांचे थकित वेतन प्रदान करण्‍याचे आश्‍वासन डॉ. सुरपाम यांनी दिले. या‍ शिष्‍टमंडळात भाजयुमो शहर अध्‍यक्ष विशाल निंबाळकर, भाजपा नेते प्रकाश धारणे, दत्‍तप्रसन्‍न महादाणी, सुरज पेदुलवार यांची उपस्थिती होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने