दोघांवर सध्या उपचार सुरू.
महाराष्ट्र:- तरुणीने लग्नाला नकार दिल्यामुळे एका तरुणाने अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेत स्वतःला पेटवून घेतले. त्यानंतर त्याने संबंधित तरुणीला व तिच्या वडिलांना मिठी मारली. शिर्डी येथे काल १७ सप्टेंबर रोजी ही घटना झाली असून या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात संबंधित तरूण खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.
सार्थक वसंत बनसोडे (वय २०, रा.साकुरी, ता.राहाता) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.दरम्यान, या घटनेत सार्थक बनसोडे हा तरुण जवळपास ८५ टक्के होरपळला होता. उपचारादरम्यान १८ सप्टेंबर ला पहाटे मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली. तर, संबंधित तरुणी जवळपास ३५ टक्के भाजली असून तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार,सार्थक बनसोडे हा दुचाकीवरून संबंधित तरुणीच्या घरासमोर गेला. तेथे त्याने या तरुणीला लग्नासाठी विचारणा केली. मात्र तिने लग्नाला नकार दिला. त्यामुळे सार्थकने सोबत आणलेल्या ड्रममधील ज्वलनशील पदार्थ स्वतःच्या अंगावर ओतून पेटवून घेतले व संबंधित तरुणी व तिच्या वडिलांना मिठी मारत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेमध्ये सार्थक जवळपास ८५ टक्के भाजला होता. उपचारादरम्यान आज पहाटे त्याचा मृत्यू झाला. तर संबंधित तरुणी ३५ टक्के भाजली असून तिचे वडील ही किरकोळ जखमी झाले आहेत. या दोघांवर सध्या उपचार सुरू आहेत.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, अप्पर पोलीस अधीक्षक दीपाली काळे, पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे हे करीत आहेत. या घटनेचे गांभीर्य ओळखून हा तपास सीआयडीकडे वर्ग करण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती मिळाली.